खासगी संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये सहभागी होऊ नये, अशा सूचना शिक्षण विभागाने दिलेल्या असल्या, तरीही खासगी संस्थांकडून घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे सध्या पेव फुटले आहे. या परीक्षा घेणाऱ्या संस्थांनी काही शाळांशीही संधान बांधले असल्यामुळे पालकांनाही या शुल्काचा भुर्दंड भरावा लागत आहे.
शासनाकडून घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेबरोबरच आता खासगी संस्थांकडून घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षांचे पेव फुटले आहे. अनेक खासगी संस्था शिष्यवृत्ती किंवा स्पर्धा परीक्षा आयोजित करतात. या परीक्षांसाठी संस्थांनी शाळांशी संधान बांधले आहे. शाळा एखाद्या इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षा बंधनकारक करतात. त्याचे शुल्क अर्थातच पालकांना भरावे लागते. नियमानुसार वार्षिक परीक्षा घेण्यात येत नसल्यामुळे अशा खासगी संस्थांच्या परीक्षा घेण्यात येत असल्याचे उत्तर शाळांकडून दिले जाते. काही शिक्षण संस्थांही अशी परीक्षांची दुकानदारी करत आहेत. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांवर ताण नको, म्हणून परीक्षा बंद केल्या, तरीही विद्यार्थ्यांना परीक्षांना सामोरे जावे लागतेच आहे.
शुल्काचे गणित
या परीक्षांसाठी किमान ५० रुपयांपासून ते साधारण २०० रुपयांपर्यंत शुल्क आकारण्यात येते. परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर होते. पहिल्या येणाऱ्या काही विद्यार्थ्यांना पारितोषिकेही दिली जातात. शाळेतील काही वर्गासाठी ही परीक्षा बंधनकारक करण्यात आली, तरीही त्यातून मिळणाऱ्या शुल्कातून नफाही कमावला जातो. काही वेळा शाळेलाही त्यातील काही भाग दिला जातो.
नावाशी साधर्म्र्य
शासनाकडून घेण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा’ किंवा महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिष्यवृत्ती परीक्षा यांच्या नावाशी आणि स्वरूपाशी साधर्म्र्य असलेल्या या परीक्षा असतात. त्यामुळे परीक्षांचे नाव ऐकले की पालकांचा गोंधळ उडतो. काही वेळा या परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा कल कळतो, अशी जाहिरातबाजीही केली जाते.
परीक्षांमध्ये सहभागी न होण्याच्या सूचना
या परीक्षांबाबत आलेल्या तक्रारींनंतर या परीक्षांमध्ये शाळांना किंवा शिक्षकांना सहभागी होणे बंधनकारक नाही, असे पत्रही शिक्षण विभागाने काढले. या परीक्षा ऐच्छिक असाव्यात असे शिक्षण विभागाने म्हटले असले, तरी अनेक शाळा या परीक्षा विद्यार्थ्यांना बंधनकारक करतात. परीक्षा म्हटली की तयारीही आलीच, त्यामुळे काही शाळांमध्ये परीक्षांच्या तयारीचे स्वतंत्र वर्गही घेण्यात येतात.

Story img Loader