पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील हिंगणे येथील तळजाई पाचगाव-पर्वती वन विभागामध्ये उगमस्थान असलेला ४० फुटी नैसर्गिक नाला गायब झाल्याचा प्रकार पुढे आला आहे. महापालिकेने प्रायमूव्ह संस्थेच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणात या नाल्याची नोंद होती. मात्र आता हा नाला केवळ कागदावरच दिसत असल्याने नाला चोरीला गेल्याची तक्रार महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> भविष्यातील वाहन उद्योगाचा वेध! पहिला ‘नेक्सजेन मोबिलिटी शो’ पुण्यात
शहरातील नाले बुजविण्यात आल्याचे प्रकार सातत्याने पुढे आले आहेत. नाल्यांवरील बांधकामांचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर महापालिकेने प्रायमूव्ह या संस्थेकडून सर्वेक्षण करून घेतले होते. त्यामध्ये शहर आणि उपनगरांतील नाले बुजवून त्यावर मोठ्या प्रमाणावर बांधकामे करण्यात आल्याची वस्तुस्थिती पुढे आली होती. मात्र त्यानंतरही महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली नव्हती. काही वर्षांपूर्वी आंबिल ओढ्याला पूर आल्यानंतर नाल्यांवरील अतिक्रमणे आणि बांधकामे, नाला बुजवण्याचे प्रकार अधोरेखित झाले. मात्र, महापालिका केवळ सर्वेक्षण करत असून प्रत्यक्ष कारवाईस टाळाटाळ करत असल्याने नाला बुजवून बांधकामे करण्याचा प्रकार अद्यापही थांबलेले नाहीत. बावधन, लोहगाव, वाघोली, उंड्री, पिसोळीसारख्या भागांमधील नाले बुजविण्यात आल्याने त्याचा फटका यापूर्वीच शहराला बसला आहे.
हेही वाचा >>> सावधान! पुण्यात डोळ्याच्या साथीचे रोज ५०० पेक्षा अधिक रुग्ण
या पार्श्वभूमीवर हिंगणे येथील नाला गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हिंगणे खुर्द येथील सर्व्हे क्रमांक पाचमधून हा नाला वाहत हिंगण्यातून मुठा नदीला मिळत होता. मात्र या नाल्याचे अस्तित्व दिसत नसल्यामुळे तो चोरीला गेल्याची तक्रार पर्यावरणप्रेमी अनंत घरत यांनी केली आहे. महानगरपालिका प्रशासन आणि विकसक यांच्या आशीर्वादानेच तो गायब झाला आहे, असा आरोप करत या प्रकाराला जबाबदार संबंधित अधिकाऱ्यांवर आणि विकसकावर कारवाई करण्याची मागणी घरत यांनी महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.
आपत्ती ओढवण्याची शक्यता
परवानगीशिवाय कोणताही भूविकास होऊ शकत नाही. ही परवानगी महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ अन्वये घेणे बंधनकारक आहे. डोंगर माथा किंवा डोंगर उतारावर विना परवाना काम होत असल्यास त्याचा परिणाम जैवविविधतेवर होतो. हाच प्रकार हिंगण्यातील जैवविविधता उद्यानासाठी (बीडीपी) आरक्षित जागेतील नाल्याबाबत झाला आहे. त्यामुळे आपत्ती ओढवण्याची शक्यता असून विकसक, जागा मालक आणि या प्रकाराला जबाबदार असणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा, असे अनंत घरत यांनी सांगितले.