लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी गुरुवारी केली.
तुषार गांधी यांनी संभाजी भिडे यांच्याविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, या तक्रारीवर कायदे तज्ज्ञांचे मत घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
आणखी वाचा-पत्नीला विवस्त्र करून नाचायला लावणाऱ्या पती विरोधात गुन्हा
तुषार गांधी म्हणाले, संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी आणि त्यांच्या कुटुंबाच्या चारित्र्यावर हल्ला केला. त्यामुळे आम्ही प्रचंड व्यथित झालो आहोत. गांधीवादी संघटनांसोबत मिळून आज आम्ही ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फत पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलीस जबाबदारीने कारवाई करतील, अशी आम्हाला आशा आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संभाजी भिडे आणि त्यांची संघटना तसेच अमरावतीतील ज्या कार्यक्रमात भिडेंनी महात्मा गांधींविषयी वादग्रस्त वक्तव्य केले, त्या कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची आमची मागणी आहे.