ईबीसी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वसूचना न देता अधिवास प्रमाणपत्राकरिता अडवणूक केली जात असल्याची तक्रार पालकांकडून केली जात आहे.
पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्टय़ा अक्षम विद्यार्थ्यांना शुल्कामध्ये सवलत आणि शिष्यवृत्ती दिली जाते. महाविद्यालय सुरू झाल्यापासून महिनाभराच्या कालावधीमध्ये यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करायचा असतो. या वर्षी कोणताही पूर्वसूचना न देता तंत्रशिक्षण विभागाकडून अर्जाबरोबर अधिवास प्रमाणपत्राची मागणी करण्यात येत आहे, अशी तक्रार पालकांकडून केली जात आहे. याबाबत एका पालकांनी सांगितले, ‘‘पिंपरी-चिंचवड पॉलिटेक्निक महाविद्यालयामध्ये माझा मुलगा शिक्षण घेत आहे. गेल्या वर्षीपर्यंत ईबीसी शिष्यवृत्तीसाठी अधिवास प्रमाणपत्र आवश्यक नव्हते. मात्र, आता महाविद्यालयाने अचानक अधिवासी प्रमाणपत्र मागितले आहे.’’
तंत्रशिक्षण संचालनालयाने मात्र, पालकांची तक्रार फेटाळली आहे. याबाबत पुणे विभागाचे सहसंचालक पी. व्ही. सरोदे यांनी सांगितले, ‘‘ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या कोटय़ामधून प्रवेश घेतले आहेत, त्यांच्याकडे महाराष्ट्रातील जन्मदाखला असला, तरी अधिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे.’’

Story img Loader