पुणे : ऐन खरीप हंगामात पावसाअभावी पेरण्या रखडल्या असताना महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडून होणाऱ्या कृषी निविष्ठा खरेदीत १४१.११ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करण्यात आला असून, त्याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसच्या ओबीसी सेलने राज्यपाल, अंमलबजवणी संचालनालय आणि लोकायुक्तांकडे केली आहे.

काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव मुंडे माहिती अधिकाराच्या अंतर्गत घेतलेली माहिती, महाराष्ट्र कृषिउद्योग विकास महामंडळ आणि कृषी मंत्री कार्यालयाकडे झालेल्या पत्रव्यवहारातून कापूस व सोयाबीन मूल्यसाखळी योजनेसाठी शेतकऱ्यांसाठी खरेदी केलेल्या निविष्ठांमध्ये १४१.११ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे.

हेही वाचा >>>पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील ‘एल थ्री’ बारच्या मालकासह दोघांविरुद्ध आणखी एक गुन्हा

या योजनेला तत्काळ स्थगिती द्यावी. निविष्ठांची खरेदी तत्काळ थांबविण्यात यावी, अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आली आहे. तसेच भष्टाचाराबाबत राज्यपाल, मुख्य सचिव, सक्तवसुली संचालनालय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते व लोकायुक्तांकडे पुराव्यांसह तक्रार दाखल केली आहे. हा घोटाळा कृषिमंत्र्यासह कृषी आयुक्तालय, मंत्रालय व कृषि उद्योग महामंडळातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने झाला आहे. दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. सीबीआय किंवा ईडीमार्फत पारदर्शी चौकशी करावी, अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आल्याची माहिती मुंडे यांनी दिली.

कापूस आणि सोयाबीनसाठी लागणाऱ्या नॅनो डीएपी, नॅनो युरिया, डिजिटल सेन्सर, कापूस साठवण गोण्या, मेटाल्डीहाईड कीटकनाशक, फवारणी पंप आदींच्या खरेदी नियमात, दर्जात फेरफार करण्यात आले आहेत. ठेकेदार, पुरवठादारांच्या सोयीचे नियम तयार करण्यात आले आहेत. अर्थ विभाग, मुख्य सचिवांची मान्यता न घेता निविष्ठा खरेदीचा घाट घातला गेला आहे.- वसंतराव मुंडे, उपाध्यक्ष, ओबीसी सेल, काँग्रेस</strong>