पुणे : राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पैसे वाटप होत असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या. या तक्रारीनुसार बारामतीचे राष्ट्रवादीचे (शरद पवार) उमेदवार युगेंद्र पवार यांच्या मालकीच्या शरयू टोयोटा या शोरूमवर आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय किरण गुजर अध्यक्ष असलेल्या नटराज नाट्यमंदिर या संस्थेवर छापा टाकण्यात आला. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांना या दोन्ही ठिकाणी केलेल्या तपासणीत आक्षेपार्ह काही आढळून आले नाही. या तपासणीवरून बारामतीत चर्चेला उधाण आले असून बारामतीमध्ये पहिल्यांदाच निवडणुकीच्या काळात पैसे वाटपावरून झाडाझडती झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पवार कुटुंबातही शरद पवार विरोधात अजित पवार अशी लढाई सुरू झाली आहे. बारामती मतदारसंघातून सलग सात वेळा निवडून आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री, बारामतीचे उमेदवार अजित पवार यांच्याविरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार निवडणूक लढवीत आहेत. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही भावनिक मुद्दा महत्त्वाचा ठरला असून पवार कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने निवडणूक चुरशीची झाली आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या होत्या.
हेही वाचा – किमान तापमानात झपाट्याने घट, थंडीचा कडाका आता वाढणार…
पैसे वाटप होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून सोमवारी रात्री युगेंद्र पवार यांच्या मालकीच्या शरयू टोयोटा या कंपनीची अचानक तपासणी करण्यात आली. तसेच अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले किरण गुजर अध्यक्ष असेलल्या नटराज नाट्यमंदिर संस्थेचीही निवडणूक आयोगाच्या पथकाने तपासणी केली. या दोन्ही ठिकाणी झालेल्या तपासणीत काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही, असे बारामतीचे प्रांताधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी सांगितले. मात्र, या तपासणीची खुमासदार चर्चा बारामतीमध्ये रंगली आणि त्यावरून आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले.
हेही वाचा – VIDEO : खासदार प्रतिभा धानोरकरांचा धमकीवजा इशारा! ‘व्हायरल व्हिडीओ’ने खळबळ
शरयू टोयोटा येथे सोमवारी रात्री पथक आले. तिथे आमचा व्यवसाय आहे. पथकाला तेथे काही आढळून आले नाही. आम्ही कायद्याचे नेहमीच पालन करतो. पैसे वाटपाची तक्रार कोणी केली, याची माहिती नाही. जोपर्यंत संपूर्ण माहिती मिळत नाही, तोपर्यंत त्याबाबत भाष्य करणे अयोग्य आहे. कायद्याने या गोष्टीला सामोरे जाण्यास तयार आहोत. – युगेंद्र पवार, उमेदवार राष्ट्रवादी (शरद पवार)