पोलीस मदत आणि तक्रार निवारण करण्यासाठी वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आलेल्या ‘डायल ११२’ संपर्क प्रणालीवर आता समाजमाध्यमातील तक्रारीही नोंदवून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे समाजमाध्यमातून नोंदविण्यात येणाऱ्या तक्रारींचा जलदगतीने निपटारा करणे शक्य होणार आहे. ‘डायल ११२’ संपर्क प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर गेल्या वर्षभरात राज्यातील साडेअकरा लाख नागरिकांनी पोलीस तक्रारी नाेंदविल्या आहेत.
महाराष्ट्र पोलीस आणि महिंद्रा डिफेन्स सर्व्हिसेस यांनी एकत्रित येऊन ही प्रणाली विकसित केली आहे. समाजमाध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींसाठी आणि त्यावर त्वरित प्रतिसादासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ नेमण्यात आले आहे. समाजमाध्यमातून तक्रार नोंदविणाऱ्या व्यक्तीला त्वरित पोलीस मदत उपलब्ध होणार आहे. ‘११२ महाराष्ट्र’ या नावाने ट्विटर आणि फेसबुकवर हँडल्स आहेत. अन्य तपशील महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. समाजमाध्यमातून नागरिक आपली तक्रार नोंदवून तातडीची मदत मागू शकतील. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्र पोलीस दलाकडून आणखी एका जलद प्रतिसाद सेवेला सुरुवात झाली आहे. राज्यातील वार्षिक गुन्हे आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यप्रणालीचे लोकार्पण करण्यात आले. पोलीस महासंचालक रजनीश शेठ, अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) कुलवंतकुमार सरंगल, विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांच्या मार्गदर्शनाखाली ‘डायल ११२’ संपर्क प्रणाली अद्ययावत करण्यात आली आहे.
हेही वाचा- देशातील सर्वाधिक खोल मेट्रो स्थानक पुण्यात
वर्षभरापूर्वी महाराष्ट्र पोलिसांनी ‘डायल ११२’ संपर्क प्रणाली सुरू केली. या संपर्क प्रणालीवर तक्रारदाराने तक्रार नोंदविल्यास त्याला मदत उपलब्ध करून दिली जाते. पोलीस, अग्निशमन दल तसेच आपतकालीन परिस्थितीत मदत उपलब्ध करून देण्यासाठी ही कार्यप्रणाली सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी पोलीस मदतीसाठी नागरिकांना ‘१००’ या क्रमांकावर संपर्क साधावा लागत होता.
हेही वाचा- खासदार गिरीश बापट रुग्णालयातून थेट जनसंपर्क कार्यालयात !
‘डायल ११२’ वर अडीच लाख महिलांच्या तक्रारी ‘डायल ११२’ संपर्क प्रणालीवर गेल्या वर्षभरात राज्यातील साडेअकरा लाख नागरिकांनी तक्रारी नोंदविल्या आहेत. त्या पैकी अडीच लाख तक्रारी महिलांच्या आहेत. या प्रणालीतून दररोज सरासरी १९ हजार तक्रारी पोलिसांना प्राप्त होतात. त्यापैकी दोन हजार ८०० तक्रारींचे निवारण केले जाते.