लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: पाणीबचतीसाठी दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आल्यानंतर विस्कळीत पाणीपुरवठ्यासंदर्भातील तक्रारी वाढण्यास सुरुवात झाली आहे. पाणीपुरवठ्यासंदर्भात एक हजार ७०० तक्रारी पाणीपुरवठा विभागाकडे आल्या असून, यातील बहुतांश तक्रारींचे निराकरण केल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आला आहे.
यंदा पाऊस उशिरा सुरू होणार असल्याने पाणीबचतीसाठी आठवड्यातून एकदा दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यासंदर्भात तक्रारी नोंदविण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. या कक्षाकडे १ हजार ७०० तक्रारी दाखल झाल्या असून त्यातील १ हजार २०० तक्रारींचे निराकरण करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.
हेही वाचा… पुणे: ‘NDA’तील उच्चपदस्थ अधिकार्याला मारहाण
पाणी नियमित न मिळणे, अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, जलवाहिन्यातून होणारी गळती, विस्कळीत पाणीपुरवठा अशा या तक्रारींचे स्वरूप आहे. महापालिकेच्या स्वतंत्र कक्षाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर या तक्रारींचे तातडीने दखल घेत ठोस उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे पाणीपुरवठाही सुरळीत झाला असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.