पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रवासी दिनात ३७ तक्रारी नोंदविण्यात आल्या. तसेच १४ सूचना पीएमपी प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. प्रवाशांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येणार असून सूचनांवर योग्य ती कार्यवाही केली जाणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बससेवेतील त्रुटी दूर करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी प्रवासी दिन उपक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून प्रत्येक आगारासाठी पालक अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. या उपक्रमानिमित्ताने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांच्या तक्रारी अधिकारी वर्गाकडून ऐकण्यात आल्या. पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा – पुणे : प्रवाशांची गैरसोय टळणार, शिवाजीनगर मेट्रो स्थानकाबाबत झाला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

हेही वाचा – पुण्यातील नाल्यांची पूरपातळी वाढल्यास आता लगेच मिळणार ‘अलर्ट’, जाणून घ्या नवीन यंत्रणा

दरम्यान, शनिवारी (१५ जुलै) पहाटे पाच ते सकाळी आठ या कालावधीत सचिंद्र प्रताप सिंह यांनी प्रत्येक आगाराची पाहणी केली. बसथांब्यावर जाऊन प्रवाशांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यावर लवकरच कार्यवाही करण्यात येणार असून, ज्या प्रवाशांना त्यांच्या दैनंदिन कामामुळे किंवा वेळेअभावी आगारात येऊन तक्रार किंवा सूचना करण्यास अडचण असेल, तर त्यांना पीएमपीच्या मुख्य बस स्थानकावर, तसेच पास केंद्रांवर अर्ज देता येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Story img Loader