पुणे : मेंदूत गाठ असल्याने ५० वर्षीय व्यक्ती रुग्णालयात दाखल झाली. तिला काही प्रमाणात विस्मृती आणि बोलण्यातील अडथळ्याचीही समस्या होती. यामुळे डॉक्टरांनी या रुग्णावर ‘अवेक क्रेनिओटॉमी’च्या माध्यमातून गुंतागुंतीची मेंदू शस्त्रक्रिया यशस्वी केली. विशेष म्हणजे या पद्धतीत रुग्णाला पूर्ण भूल न देता तो शुद्धीवर असताना त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या रुग्णाला विस्मृती, शब्द आठवण्यातील अडचण आणि अपस्माराचे झटके येण्याचा त्रास होत होता. त्यामुळे त्याला रुग्णालयात आणण्यात आले होते. त्याच्या मेंदूची एमआरआय तपासणी करण्यात आली. तपासणीत रुग्णाच्या मेंदूतील डाव्या ‘सुपेरिअर टेम्पोरल गायरस’मध्ये गाठ असल्याचे निष्पन्न झाले. मेंदूचा हा भाग मानवी भाषा आणि स्मृती यांच्याशी निगडित असतो. त्यामुळे डॉक्टरांनी या रुग्णावर ‘अवेक क्रेनिओटॉमी’च्या माध्यमातून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्याची वाचा जाऊ नये आणि भाषेची समस्या येऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आले. बाणेरमधील मणिपाल रुग्णालयात न्यूरोसर्जन डॉ. अमित ढाकोजी आणि त्यांच्या पथकाने रुग्णावर ‘अवेक क्रेनिओटॉमी’च्या माध्यमातून यशस्वी शस्त्रक्रिया केली.

हेही वाचा – धक्कादायक! डेंग्यू बळीचा पुणे पालिकेला दोन महिन्यांनंतर लागला ‘शोध’

याबाबत डॉ. ढाकोजी म्हणाले, की हे प्रकरण गुंतागुंतीचे होते. मेंदूतील गाठ काढण्यासह रुग्णाची स्मरणशक्ती आणि भाषेची समस्या दूर करण्याचे आव्हान होते. रुग्णालयात येण्याआधी रुग्णाला अपस्माराचे झटके येण्याची समस्या होती. त्यावर औषधोपचार सुरू होते; परंतु, हळूहळू त्याला विस्मृती आणि भाषेची समस्या जाणवू लागली. अवेक क्रेनिऑटोमी प्रक्रियेमध्ये रुग्ण घाबरू शकतो अथवा हलू शकतो. म्हणूनच त्यासाठी तज्ज्ञ हातांची गरज असते. या शस्त्रक्रियेदरम्यान तो पूर्णतः जागृत होता. या प्रक्रियेदरम्यान कोणतीच समस्या उद्भवली नाही.

हेही वाच – सावधान! पिकांवर कीडनाशकांचा वापर वाढतोय; जाणून घ्या कारणे

‘अवेक क्रेनिओटॉमी’ म्हणजे काय?

‘अवेक क्रेनिओटॉमी’मध्ये रुग्ण शुद्धीवर आणि पूर्णतः जागा असतो. मेंदूच्या पेशींमध्ये दुखणारे घटक नसतात. म्हणून सर्जरी करत असताना त्याचे ताण त्याला जाणवत असतात; परंतु वेदना होत नाहीत. या प्रक्रियेदरम्यान केवळ कवटी आणि डोक्याजवळील स्नायूंना बधिर करावे लागते. या प्रकरणात रुग्णाची भाषेची समस्या सोडवण्यासाठी, तसेच अन्य समस्या येऊ नयेत यासाठी त्याला जागे ठेवण्यात आले. संपूर्ण शस्त्रक्रियेदरम्यान हा रुग्ण डॉक्टरांशी संवाद साधत होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Complicated brain surgery in pune while keeping the patient conscious pune print news stj 05 ssb
Show comments