लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शहरातील गृहसंकुले, मोठ्या गृहप्रकल्पांमध्ये उभारण्यात आलेल्या सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर बंद ठेवले जात असल्याने आता गृहप्रकल्पातील एसटीपी प्रकल्पांसाठी सर्वंकष धोरण तयार केले जाणार आहे. तसेच, सोसायट्यांमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित आहेत की नाही, यावरही ऑनलाइन पद्धतीने लक्ष ठेवले जाणार आहे.

शंभरहून अधिक सदनिका असलेल्या मोठ्या गृहप्रकल्पात सांडपाणी आणि मैलापाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे बंधनकारक आहे. त्यानुसार सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारले जातात. मात्र, ते केवळ बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळेपर्यंतच सुरू ठेवले जातात. त्यानंतर प्रकल्प बंद ठेवले जात असल्याने महापालिकेच्या सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्पांवरील ताण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांडपाणी व्यवस्थापनासंदर्भात बैठक घेतली. त्यामध्ये सोसायट्यांवर अंकुश ठेवण्यासाठी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पासंदर्भातील सर्वंकष धोरण आखण्याचे निश्चित करण्यात आले.

शहरामध्ये प्रतिदिन एक दशलक्ष लिटर (एमएलडी) एवढ्या पाण्यावर प्रक्रिया होणे आणि त्यानंतर ते नदीपात्रात सोडून देणे अपेक्षित आहे. मात्र, महापालिकेकडील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता कमी आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने जायका प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प अद्यापही पूर्ण झालेला नाही. जायका प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महापालिकेच्या प्रक्रिया प्रकल्पांच्या क्षमतेमध्ये वाढ होऊन प्रतिदिन साडेआठशे ते नऊशे एमएलडी एवढ्या पाण्यावर प्रक्रिया होईल, असा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर शहरातील मोठी गृहसंकुले, गृहप्रकल्पांमधील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यास प्रतिदिन ११० एमएलडी एवढ्या पाण्यावर प्रक्रिया करणे शक्य होणार आहे. त्यामुळे सोसायट्यांच्या आवारातील बंद सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांवर महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे.

दरम्यान, शहरातील किती सोसायट्यांमध्ये सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प आहेत, याची कोणतीही अचूक माहिती महापालिका प्रशासनाकडे नाही. मात्र, महापालिकेकडे असलेल्या नोंदीनुसार ६०० सोसायट्यांनी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांसाठी परवानगी घेतली आहे. महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार केवळ २५० सोसायट्यांमध्ये प्रक्रिया प्रकल्प असून, त्यातील २२५ प्रकल्प नियमित आणि पूर्ण क्षमतेने कार्यान्वित असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

वार्षिक २० लाखांचा खर्च अपेक्षित

सोसायट्यांमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प चालविण्यासाठी वार्षिक पंधरा ते वीस लाखांचा खर्च येतो. त्यामध्ये वीज देयके, देखभाल-दुरुस्तीचा खर्चाचा समावेश आहे. प्रक्रिया प्रकल्पामधील शुद्ध झालेले पाणी फ्लशसाठी वापरले जाते. हा प्रकल्प बंद असल्यास सोसायट्यांकडून नियमानुसार दंड आकारला जातो.

सोसायट्यांमधील बंद प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्यासाठी लवकरच सर्वंकष धोरण तयार केले जाईल. -पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका