केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज पुणे दौऱ्यावर आलेले आहेत. आगामी पुणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. आज दिवसभरात त्यांच्या हस्ते विविध कार्यक्रम पार पडल्यानंतर सायंकाळी त्यांनी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्श केले. यावेळी त्यांनी आपला जुना मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी विधानसभा निवडणुकी अगोदर नेमकी काय चर्चा झाली होती, हे देखील सांगितले.
अमित शहा म्हणाले, “महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी मी २०१९ मध्ये आलो होतो. त्यावेळी शिवसेनेसोबत जी चर्चा झाली, मी स्वत: केलेली आहे. मी पुन्हा आज सांगू इच्छितो त्यावेळी ठरलं होतं देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात निवडणूक लढली जाईल आणि मुख्यमंत्री भाजपाचा होईल. मात्र ते बदलले, सत्तेसाठी हिंदुत्वाशी समझोता केला. दोन पिढ्यांपासून ज्यांच्याशी लढत होते, त्यांच्या मांडीवर जाऊन बसले आणि म्हणतात आम्ही तर असं म्हणालोच नाही.”
“…जर हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि करा दोन-दोन हात ” ; अमित शहा यांचं खुलं आव्हान
तसेच, “ते सांगतात की मी खोटं बोलतोय. चला एका सेकंदासाठी मान्य करू, पण तुमच्या सभेच्या पाठीमागे जे बॅनर लागत होते ना, त्यात तुमच्या फोटोची आणि मोदींच्या फोटोची साईज जरा बघा. तुमचा फोटो एक चतुर्थांश होता. प्रत्येक भाषणात तुम्हाला मोदींचं नाव घ्यावं लागत होतं. तुमच्याच उपस्थितीत मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोघांनी म्हटलं होतं की, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली आहे आणि एनडीए विजयी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री बनतील. मात्र तुम्हाला तर मुख्यमंत्री बनायचं होतं, तुम्ही आमच्यासोबत विश्वासघात केला आणि सत्तेवर बसलात.” असंही अमित शहा यांनी बोलून दाखवलं.
“ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपमानित करण्याची एकही संधी काँग्रेसने सोडली नाही ”
याचबरोबर, “मी काही काळ अगोदर आलो होतो, तेव्हा मी म्हणालो होतो की महाराष्ट्राचे महाविकासआघाडी सरकार अशाप्रकारचं सरकार आहे की जी अशी तीनचाकी रिक्षा आहे, जिचे चाक वेगवेगळ्या दिशेला जात आहे. मात्र माझी थोडी चूक झाली. मी खूप आशावादीपणे या सरकारबद्दल विचार केला. आज मी यामध्ये थोडा बदल करू इच्छितो. महाराष्ट्राचे महाविकासआघाडी सरकार तीन चाकी ऑटो रिक्ष आहे, ज्याची तिन्ही चाक वेगवेगळ्या दिशेला आहेत आणि तिन्ही चाकं पंक्चर आहेत जे चालतच नाहीत. केवळ धूर बाहेर सोडते आणि प्रदूषण करते.” अशा शब्दांमध्ये अमित शहा यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
PHOTOS : गृहमंत्री अमित शहा यांनी केली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा
तर, भाजपा पदाधिकरी आणि कार्यकर्त्यांना उद्देशून ते म्हणाले की, “महाराष्ट्रातील जनेतकडे तुम्हाला जावं लागेल, घराघरात जावं लागेल आणि विचारावं लागेल की हे सरकार महाराष्ट्राचं कल्याण करू शकते का? जो महाराष्ट्र स्वातंत्र्यानंतर कित्येक वर्षे प्रत्येक क्षेत्रात अग्रस्थानी राहिला. देशाचं नेतृत्व केलं. सहकार चळवळ असो, उद्योग क्षेत्रात गुंतवणूक, निर्यात, प्रत्यक्ष कर वसुली, कृषी उत्पादन, दुग्ध उत्पादन, महाराष्ट्राने अनेक वर्ष देशाचं नेतृत्व केलं आहे. ही लोक महाराष्ट्राला जुनं वैभव प्राप्त करून देऊ शकतात का?” तसेच, “ हे बिनकामाचं सरकार आहे आणि या सरकारच्या पडझडीची सुरूवात पुणे महापालिकेच्या निवडणूक निकालापासून झाली पाहिजे.” असंही यावेळी अमित शहा यांनी सांगितलं.