औद्योगिक मंदीमुळे टाटा मोटर्स कंपनीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पिंपरीत ‘ब्लॉक क्लोजर’चा प्रयोग केल्यानंतर आता अधिकाऱ्यांसाठी ‘सक्तीची निवृत्ती’ योजना लागू केली आहे. पिंपरी येथील प्रकल्पात अनेक अधिकाऱ्यांना कामगिरी खालावल्याच्या मुद्दयावरून सक्तीची निवृत्ती घेण्यास सांगण्यात येत असून त्यासाठी मुबलक पैसे देण्याची तयारी दर्शवली जात असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. कंपनी व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे अधिकारी वर्गात अस्वस्थता आहे.
टाटा मोटर्सच्या व्यापारी वाहन उद्योग विभागात ही योजना लागू करण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. टेम्पो, ट्रक, सुमो, इंडिका, इंडिगो, सफारी, ‘६०९’, ‘४०७’ आदी वाहन उत्पादन करणाऱ्या या विभागात सध्या सुमारे पाच हजार अधिकारी आहेत. कामगिरी चांगली नसलेल्या अधिकाऱ्यांना सक्तीने निवृत्त करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार, त्यांना बोलावून घेत निवृत्ती स्वीकारण्यास सांगितले जात आहे. मुंबई कार्यालयातून याबाबतचे आदेश आल्याचे सांगतानाच ठराविक रक्कम देण्याची तयारी व्यवस्थापनाकडून दाखवली जात आहे. याप्रकारामुळे अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे. यासंदर्भात, कंपनी व्यवस्थापनाची बाजू समजू शकली नाही.
वाहन उद्योग क्षेत्रात आलेल्या मंदीमुळे टाटा मोटर्स कंपनीचे उत्पादन घटले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या उत्पादनातील तफावत चिंताजनक आहे. व्यवस्थापनाने वर्षांतील १२ दिवस ‘ब्लॉक क्लोजर’चा निर्णय घेतला व त्यानुसार अंमलबाजवणी सुरू केली. महत्त्वाच्या ‘कार प्लांट’ विभागात जुलै दरम्यान सहा दिवस तर १५ ऑगस्टच्या सुटीला जोडून तीन दिवस उत्पादन बंद होते. पिंपरी टाटा मोटर्समध्ये डिसेंबरमध्ये चार दिवस उत्पादन ठेवण्यात आले होते. मंदीचा फटका कंपनीप्रमाणे पिंपरी महापालिकेलाही बसतो आहे. टाटा मोटर्सकडून मिळणाऱ्या नेहमीच्या उत्पन्नापेक्षा एलबीटीचे खूप कमी उत्पन्न मिळत असल्याने कोटय़वधींचा फटका बसतो आहे. त्यामुळे महापालिकाही चिंतेत आहे.

Story img Loader