घरकामासाठी येणाऱ्या मोलकरणीवर संगणक अभियंत्याने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
प्रशांत यादव (वय ३२, रा. साईप्रेम पार्क, पिंपळेगुरव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यादव हा हिंजवडी येथील एका नामांकित आयटी कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करतो. त्याची पत्नी बाळंतपणासाठी माहेरी गेली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ३५ वर्षीय पीडित महिला त्यांच्याकडे घरकाम करते. २६ एप्रिल रोजी दुपारी ही महिला घरकाम करण्यासाठी आल्यानंतर यादवने महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर त्या महिलेने या घटनेची माहिती सोसायटीतील काही महिलांना दिली. पण, घाबरल्यामुळे तिने पोलिसाकडे तक्रार दिली नाही. त्यानंतर ही महिला २९ एप्रिल रोजी पुन्हा घरकाम करण्यासाठी यादवच्या घरी गेली असता त्या दिवशीही त्याने महिलेवर बलात्कार केला. यााबाबत कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर महिलेने एका महिला संघटनेला घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात महिलेला घेऊन तक्रार दिल्यानंतर यादवला अटक करण्यात आली आहे. यादवने यापूर्वीही काम करणाऱ्या महिलांशी छेडछाड करणाऱ्याचा प्रयत्न केल्याचे तपासात पुढे आले आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Story img Loader