पुणे : कोथरूड भागात दुचाकीस्वार अभियंता तरुणाला मारहाण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. श्री शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतून दुचाकी काढण्याचा प्रयत्न करत असताना तरुणाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा दाखल करण्यात आलेले तिघे जण कोथरूडमधील एका गुंड टोळीशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
देवेंद्र पुरुषोत्तम जोग (वय ३३, रा. कोथरूड) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोग यांना गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत जोग यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड भागातील भेलकेनगर परिसरातून बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास एका मंडळाकडून श्री शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली.
संगणक अभियंता जोग यांना सुटी असल्याने ते दुपारी साडेचारच्या सुमारास दुचाकीवरून खरेदीसाठी बाहेर पडले. खरेदी करून घरी जात असताना समोरून मिरवणूक येत होती. दुचाकीवरून वाट काढणाऱ्या जोग यांना तिघांनी अडविले. दुचाकी नीट चालविता येत नाही का, अशी विचारणा करून तिघांनी जोग यांना बेदम मारहाण केली. नाकावर ठोसा बसल्याने त्यांना दुखापत झाली. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती वडिलांना दिली. जखमी अवस्थेतील जोग यांनी कोथरुड पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. कोथरूड भागात एका गुंड टोळीचा दबदबा आहे. गुंड टोळीतील सराइतांनी मारहाण केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मिरवणुकीत गुंड टोळीचा म्होरक्या सहभागी झाला होता.