पिंपरी : व्यायाम करून घरी परतलेल्या संगणक अभियंत्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने अभियंत्याला रुग्णालयात दाखल केले होते. संजीव कुमार (वय ४४, रा. हिंजवडी) असे मृत्यू झालेल्या संगणक अभियंत्याचे नाव आहे.
कुमार हे हिंजवडी माहिती आणि तंत्रज्ञान नगरीतील एका नामांकित कंपनीत संगणक अभियंता म्हणून नोकरी करीत होते. ते नियमितपणे व्यायाम शाळेत जाऊन व्यायाम करत असत. कुमार हे मंगळवारी हिंजवडीतील व्यायाम शाळेत गेले होते. तेथे त्यांनी व्यायाम केला. व्यायाम केल्यानंतर ते घरी परतले. घरी आल्यानंतर काही वेळाने त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तत्काळ हिंजवडीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> जलवाहिनी टाकण्याच्या कामामुळे आजपासून पुणे-सोलापूर मार्गावरील वाहतुकीत बदल
अतिव्यायाम हानिकारक?
सध्या हिवाळा सुरू आहे. हिवाळ्यात शरीर कमावण्यासाठी व्यायामाला प्राधान्य दिले जाते. शरीर बनविण्याकडे तरुणाईचा कल वाढला आहे. त्यामुळे व्यायाम शाळेत मोठी गर्दी होत आहे. तासन् तास व्यायाम केला जातो. अति व्यायाम आरोग्यासाठी हानिकारक ठरतोय का, असा प्रश्न हिंजवडीतील दोन्ही घटनांवरून उपस्थित होत आहे.
व्यायामशाळेत शरीराला अति ताण दिला जातो. अति व्यायाम घातक आहे. शरीराला आवश्यक तेवढाच व्यायाम केला पाहिजे. वेळेत जेवण केले पाहिजे. शरीराची ताकद वाढविण्यासाठी प्रोटीन सप्लिमेंट्स पावडर आणि प्रोटीन शेक घेतले जाते. हे शरीराला हानिकारक आहे. यामुळे अशा घटना घडतात. आहारातून गरजेचे प्रोटीन्स शरीराला मिळत असतात. त्यामुळे सप्लिमेंट्स पावडर घेणे टाळले पाहिजे. – प्रकाश मोहारे, आंतरराष्ट्रीय खेळाडू, पॉवरलिफ्टिंग