पुणे : विवाहाच्या आमिषाने संगणक अभियंता तरुणीची ३४ लाखांची फसवणूक करणाऱ्या एकाला बाणेर पोलिसांनी मुंबईतून अटक केली.साईश विनोद जाधव (वय २५, रा. साईबाबानगर, शेल काॅलनी रस्ता, चेंबूर, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी बाणेर भागातील एका हाॅस्टेलमध्ये राहायला आहे. ती बालेवाडीतील हायस्ट्रीट परिसरातील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीने २०२३ मध्ये एका विवाह विषयक संकेतस्थळावर नावनोंदणी केली होती. आरोपी साईश जाधवने तरुणीशी संपर्क साधून विवाह करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. त्यानंतर मे २०२३ मध्ये तो तिला भेटण्यासाटी बाणेर परिसरात आला. बाणेर भागातील एका उपाहारगृहात दोघांनी जेवण केले. त्यानंतर तो पुन्हा तरुणीला भेटण्यासाठी बाणेर परिसरात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तरुणीने त्याच्या कुटुंबीयांबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने आई-वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असून, भाऊ दुबईत नोकरीला आहे, अशी बतावणी केली. तरुणीने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. दोघांमध्ये संवाद वाढला. त्यानंतर एका मित्राने माझी आर्थिक फसणूक केली असून, पैसे न भरल्यास मला कारागृहात जावे लागेल, अशी बतावणी केली. आपण लवकरच विवाह करु, असेही त्याने तिला सांगितले. मोबाइल संचात बिघाड झाल्याचे सांगून त्याने तरुणीकडून महागडा मोबाइल संच वापरास घेतला. अडचणीत असल्याने त्वरीत आर्थिक मदत हवी आहे, असे सांगून त्याने तरुणीला तातडीने पैसे पाठविण्यास सांगितले. तरुणीने ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठविले. माहिती-तंत्रज्ञान कंपनीतील व्यवस्थापकांकडून वेळेवेळी १५ लाख रुपये घेतले, तसेच खासगी वित्तीय संस्थेकडून तिने कर्ज काढून आरोपी साईशला पैसे पाठविले. गेल्या दीड ते पावणेदोन वर्षात त्याने तरुणीकडून वेळोवेळी ३३ लाख ८२ हजार रुपये घेतले. तरुणीने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारणा सुरू केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली.

बाणेर पोलिसांनी तपास करुन आरोपी साईशला अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण तपास करत आहेत. मध्यंतरी बिबवेवाडी भागातील एका डाॅक्टर तरुणीने दवाखान्यात विषारी ओैषध पिऊन आत्महत्या केली होती. तरुणीला सांगलीतील एकाने डाॅक्टर तरुणाने विवाहाचे आमिष दाखवून तिच्याकडून पैसे घेतले होते. तरुणीने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने विवाहित असल्याचे तिला सांगितले होते. डाॅक्टर तरुणीला मानसिक धक्का बसल्याने तिने बिबवेवाडीतील दवाखान्यात आत्महत्या केली होती. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी डाॅक्टर तरुणाला नवी मुंबईतून अटक केली होती.