लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : शीतपेयातून गुंगीचे ओैषध देऊन संगणक अभियंता तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैसर्गिक कृत्य करून आरोपींनी तरुणीचे छायाचित्र समाज माध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन ३० लाख रुपये उकळले. तसेच तिच्याकडील दोन महागडे मोबाइल संच आरोपींनी घेतले. मुंबईतील कांदिवली भागातील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पीडित तरुणीने नुकतीच हडपसर भागातील काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, तमीम हरसल्ला खान (रा. कांदिवली, मुंबई) याच्यासह तीन मित्रांविरुद्ध बलात्कार, अनैसर्गिक कृत्य, फसवणूक, अपहार, तसेच धमकावून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीवर अत्याचार करण्याची घटना मुंबईतील कांदिवली परिसरात घडली. त्यानंतर काळेपडळ पोलिसांनी याप्रकरणाचा तपास कांदिवली पोलिसांकडे तपासासाठी सोपविला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मूळची कर्नाटकातील आहे. ती एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला आहे. सध्या ती पुण्यात वास्तव्यास आहे. २०२१ मध्ये तिची आरोपी खान याच्याशी समाज माध्यमातून ओळख झाली होती. खान याने तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. त्यानंतर तरुणी त्याला भेटण्यासाठी कांदिवलीत गेली. कांदिवलीतील एका हॉटेलमध्ये तरुणीला शीतपेयातून गुंगीचे औषध देण्यात आले. त्याने तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार केला. तरुणीला मोटारीतून मुंबईहून पुण्यात नेले. मोटारीत त्याने तरुणीवर अत्याचार केला.
खान याने तीन मित्रांना बोलावून घेतले. त्यांनी तरुणीशी अनैसर्गिक कृत्य केले. आरोपींनी तिची मोबाइलवरुन छायाचित्रे काढली. छायाचित्रे समाज माध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्याकडून दहा लाख रुपये उकळले. त्यानंतर तरुणीकडे आणखी पैशांची मागणी करण्यात आली. तरुणीने बँकेकडून १८ लाख रुपये कर्ज काढून आरोपींना दिले. आरोपींनी तिच्या क्रेडीट कार्डचा वापर करुन दोन महागडे मोबाइल संच खरेदी केले. तरुणीला जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपींकडून सतत येणाऱ्या धमकीमुळे घाबरलेल्या तरुणीने काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून घेतला आहे. हा गुन्हा तपासासाठी कांदिवली पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती काळेपडळ पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणाचा तपास आता कांदिवली पोलिसांकडून करण्यात येत आहे.