हिंजवडीतील इन्फोसिस कंपनीच्या आवारात गेल्या पंधरवडय़ात संगणक अभियंता रसिला ओपी हिचा सुरक्षारक्षकाक डून खून झाल्याच्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर आयटी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विशेषत: आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने पोलिसांनी आयटी पार्कमधील विविध कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या आहेत. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. सुरक्षेविषयी गाफील राहू नका, कंपनीच्या आवारात सुरक्षित वातावरण तयार करा, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. हिंजवडीतील आयटी पार्कपासून आठशे मीटर अंतरावर असलेल्या मारुंजी गावानजीक असलेल्या रस्त्यावर २९ मे २०१४ रोजी इन्फोसिस कंपनीतील कर्मचारी वरुण सेठी (वय ३४) यांचा खून करण्यात आला होता. संगणक अभियंता असलेल्या वरुण यांच्या खूनप्रकरणाचा पोलिसांकडून सलग वर्षभर तपास करण्यात आला. चोरी किंवा कौटुंबिक वाद यासह अनेक शक्यता पोलिसांनी पडताळून पाहिल्या. मात्र, वरुण यांच्या खुनाचे गूढ पोलिसांना उकलता आलेले नाही.
बावधन परिसरात सहा वर्षांपूर्वी झालेल्या संगणक अभियंता दर्शना टोंगरे आणि वरुण सेठी या दोघांच्या खुनात काहीसे साम्य देखील आहे. पोलिसांकडून या दोन्ही खूनप्रकरणांचा छडा लावण्यासाठी आजही प्रयत्न करण्यात येत आहेत. नोएडातील आयटी कंपनीत कामाला असलेले वरुण सुभाष सेठी हे विवाहित होते. ते मूळचे पंजाबमधील भटिंडा शहरातील होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, वडील असा परिवार आहे. नोएडातील नोकरी सोडून ते हिंजवडी येथील आयटी पार्कमधील इन्फोसिस कंपनीत नोकरीला लागले. ५ मे २०१४ रोजी ते इन्फोसिसमध्ये रुजू झाले. हिंजवडी भागात ते राहात होते. त्यांची पत्नी आणि मुलगा गुरगांवमध्ये राहात होते. नोकरीत स्थिरावल्यानंतर पत्नी आणि मुलाला घेऊन ते पुण्यात स्थायिक होणार होते. त्यांनी हिंजवडी आयटी पार्कलगतच्या परिसरात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले होते. आयटी पार्कलगतच्या परिसरात मारुंजी गाव आहे. हा भाग तसा ग्रामीण आहे. मारुंजी रस्त्यावर असलेल्या सोसायटीत भाडेतत्त्वावर सदनिका घेण्यासाठी ते प्रयत्न करत होते.
आयटी पार्कपासून काही अंतरावर असलेल्या मारुंजी गावाचा रस्ता कच्चा होता. त्या तुलनेत आयटी पार्कच्या आवारातील सुविधा, रस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत. २९ मे रोजी सायंकाळी पावणेआठच्या सुमारास वरुण कंपनीतून बाहेर पडले. मारुंजी रस्त्यावर असलेल्या एका सोसायटीतील सदनिका पाहण्यासाठी ते चालत निघाले होते. आयटी पार्कपासून हे अंतर साधारणपणे
साडेतीन किलोमीटर आहे. एमपी रेसिडेन्सी या सोसायटीतील सदनिका पाहून रात्री नऊच्या सुमारास ते परत निघाले होते. त्याचवेळी त्यांच्यावर मारेकऱ्याने हल्ला चढवला. त्यांच्या छातीवर तीक्ष्ण शस्त्राने वार करून मारेकरी पसार झाला. अंधाऱ्या रस्त्यावर असलेल्या गुरुकृपा प्रसूतिगृहाच्या प्रवेशद्वाराबाहेर ही घटना घडली होती. प्रवेशद्वाराच्या समोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वरुण यांना एका नागरिकाने पाहिले. त्याने तातडीने या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरुण यांच्याकडे सापडलेल्या इन्फोसिस कंपनीच्या ओळखपत्रावरून ओळख पटवण्यात आली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश भोसले आणि त्यांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याल यांनी घटनास्थळी भेट दिली. संगणक अभियंता तरुणाच्या खुनाचा छडा लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. हिंजवडी पोलिसांबरोबरच गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरू केला.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा वरुण यांच्या बॅगेत टॅब, पाकिटात सिंगापूरचे शंभर डॉलर, सहा डेबिट कार्ड सापडली होती. या भागात नेहमी लूटमारीच्या घटना घडतात. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने खून झाल्याचा संशय पोलिसांना होता, असे हिंजवडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुरेश भोसले यांनी सांगितले. तपासाबाबत माहिती देताना ते म्हणाले की, वरुण यांचा खून झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. मारुंजी तसेच लगतच्या भागात लूटमारीचे गुन्हे करणाऱ्या चोरटय़ांची चौकशी सुरू करण्यात आली. त्यांच्या हालचालींवर पोलिसांकडून नजर ठेवण्यात आली होती. पोलिसांकडून जवळपास ३७ चोरटय़ांची चौकशी करण्यात आली. दरम्यान, पिंपरी पोलिसांनी चोरटय़ांच्या एका टोळीला पकडले होते. या टोळीतील चोरटय़ांनी खून केल्याचा संशय सुरुवातीला होता. मात्र, तपासात ही शक्यता फेटाळली गेली. पोलिसांचे पथक तपासासाठी दिल्लीतही गेले होते. सेठी यांचा कोणाशी वाद होता का, या बाबी पडताळण्यात आल्या होत्या. त्यांचे वडील आणि काका यांचा जबाब पोलिसांकडून नोंदवण्यात आला होता. वरुण यांची पुण्यात कोणाशी ओळख नव्हती. त्यांचे कोणाशी शत्रुत्व नव्हते. त्यामुळे तपासात या शक्यता मागे पडल्या. वरुण यांच्या छातीवर एकच वार होता. बर्फ फोडण्याचा टोचा त्यांच्या छातीत मारण्यात आला होता. अणकुचीदार टोचा छातीत शिरल्याने मोठय़ा प्रमाणावर रक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला होता.
बावधन भागात दर्शना टोंगरे या संगणक अभियंता तरुणीचा खून झाला होता. त्याच पद्धतीने वरुण यांचा खून झाला. अंधाऱ्या रस्त्यावर गाठून त्यांच्यावर वार करण्यात आले होते. मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी सलग वर्षभर तपास केला. तांत्रिक तपासात अपयश आले होते. त्यानंतरही त्यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सोडलेले नाहीत.