लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन संगणक अभियंत्याने स्वत:च्या तीन वर्षांच्या मुलाचा चाकूने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली. नगर रस्त्यावरील मोकळ्या जागेत मुलाचा मृतदेह दुपारी सापडला.
हिंमत माधव टिकेटी (वय ३) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी माधव साधुराम टिकेटी (वय ३८, रा. रतन प्रेस्टीज बिल्डिंग, चंदननगर) याला चंदननगर पोलिसांनी अटक केली. याबाबत माधवच्या पत्नीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधव चंदननगर भागात कुटुंबीयांसमवेत राहतो. त्यांना तीन वर्षांचा मुलगा आणि आठ वर्षांची मुलगी आहे. आरोपी माधव एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला आहे. गुरुवारी दुपारी माधव घरात होता. मुलीला शाळेतून घेऊन येतो, असे सांगून तो तीन वर्षांचा मुलगा हिंमत याला घेऊन घरातून बाहेर पडला.
दरम्यान, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसमधून मुलगी सोसायटीच्या आवारात आली. तेथून ती घरी आली. माधव मुलीबरोबर न आल्याने पत्नीने त्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा मुलाला घेऊन तो पानपट्टीत सिगारेट ओढण्यासाठी आला होता. रात्री उशिरापर्यंत माधव आणि मुलगा घरी न आल्याने त्यांनी माधवच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा त्याचा मोबाइल क्रमांक बंद होता. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास त्यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात पती आणि मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे, गुन्हे शाखेच्या निरीक्षक स्वाती खेडकर, सहायक निरीक्षक प्रशांत माने, उपनिरीक्षक अजय असवले, राहुल कोळपे, हवालदा विश्वनाथ गोते यांनी तपास करून त्याला अटक केली.
मुलगा बेपत्ता झाल्याचा बनाव
गेल्या काही दिवसांपासून माधव पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत होता. त्याला माहिती-तंत्रज्ञान कंपनीतून दोन महिन्यांपूर्वी काढून टाकण्यात आले होते. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला. माधव खराडीतील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होता. पोलिसांनी त्याचा शोध घेतला. मध्यरात्री त्याला ताब्यात घेण्यात आले. तेव्हा त्याने दारू प्यायल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी त्याच्याकडे मुलाबाबत विचारणा केली. तेव्हा हडपसर भागातून मुलगा बेपत्ता झाल्याची बतावणी केली. पोलिसी खाक्या दाखविताचा त्याने मुलाचा चाकूने गळा चिरून खून केल्याची कबुली दिली. मुलाचा मृतदेह नगर रस्त्यावरील मोकळ्या जागेत टाकून दिल्याचे त्याने सांगितले. एका दुकानातून त्याने चाकून आणि ब्लेड खरेदी केले होते. मुलाचा खून करून तो लॉजमध्ये पहाटे झोपायला आला होता.
आरोपी माधव टिकेटी पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत होता. चारित्र्याच्या संशयातून त्याने स्वत:च्या तीन वर्षांच्या मुलाचा खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. -हिंमत जाधव, पोलीस उपायुक्त, परिमंडळ चार