एका विवाह नोंदणी संकेतस्थळावर दोघांची ओळख झाली. त्या व्यक्तीने स्वत: एनआरआय असून अमेरिकेत एका नामांकित कंपनीत व्यवस्थापक असल्याचे सांगितले. लग्नाचे आणि मोठय़ा पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला. त्या महिलेला खोटे बोलून तिच्याकडून लाखो रुपये उकळले. मात्र, आरोपीने अशाच पद्धतीने फसविलेल्या एका तरुणीने त्याचे बिंग फोडल्यामुळे हा सर्व प्रकार संगणक अभियंता असलेल्या महिलेला समजला. तिने दिलेल्या तक्रारीवरून विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ३३ वर्षीय संगणक अभियंता असलेल्या महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अजय प्रशांत कुलकर्णी उर्फ विप्पीन पाकणीकर व अनुपमा कुलकर्णी (रा. हैदराबाद) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक झालेली महिला ही हिंजवडी परिसरातील एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला आहे. तिने एका नामांकित संकेतस्थळावर विवाह नोंदणी केली होती. या ठिकाणच्या माहितीवरून आरोपी कुलकर्णी याने महिलेशी संपर्क साधला. या महिलेला तो एनआरआय असल्याचे सांगून अमेरिकेतील एका नामांकित कंपनीत व्यवस्थापक म्हणून नोकरीला असल्याचे सांगितले. या दोघांच्या भेटी वाढून चांगली ओळख झाली. कुलकर्णी याने दरम्यानच्या काळात त्याची आई अनुपमा यांची भेट घडवून आणली. तिला लग्नाचे आमिष दाखवून हैदराबाद येथील आयटी कंपनीत नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
या काळात कुलकर्णी याने त्याच्याजवळील सर्व कागदपत्रे, डेबिट कार्ड हरवल्याचे महिलेला सांगितले. त्याची आई कॅन्सरची रुग्ण असल्यामुळे तिच्यावर उपचाराची त्वरित आवश्यकता असून त्यासाठी पैशाची गरज असल्याचे महिलेला सांगितले. विप्पीन पाकणीकर या चुलतभावाच्या खात्यावर पैसे टाकण्यास सांगितले. त्यानुसार महिलेने वेळोवेळी त्या खात्यावर सहा लाख ४२ हजार रुपये भरले. तसेच, तिचा लॅपटॉप देखील आरोपी घेऊन गेला होता. फेब्रुवारी २०१५ मध्ये एका तरुणीने महिलेस फोन करून आरोपीची खरी माहिती दिली. या आरोपीने तिला देखील अशाच पद्धतीने फसविल्याचे सांगितले. तिने याबाबत आरोपीकडे विचारणा केली. याबाबत पोलिसांकडे तक्रारही केली. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांनी सांगितले की, या गुन्ह्य़ातील आरोपीने सांगितलेले नाव खरे आहे का, त्याने आणखी कोणाला फसविले आहे का, याचा तपास सुरू आहे.

Story img Loader