लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : पत्नीशी होणारे वाद, तसेच चारित्र्याच्या संशयातुन स्वत:च्या तीन वर्षांच्या मुलाचा खून करण्यासाठी संगणक अभियंत्याने चाकू, तसेच ब्लेडचा वापर केल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली आहे. पोलिसांनी खून करण्यासाठी वापरलेला चाकू जप्त केला असून, खून, तसेच पुरावा नष्ट केल्याप्रकरणी कलमवाढ करण्यात आली आहे. संगणक अभियंत्यााला २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एस. गायगोले यांनी शनिवारी दिले.
माधव साधूराव टेकेटी (वय २८, रा. चंदननगर) असे पोलीस कोठडी सुनावलेल्या संगणक अभियंत्याचे नाव आहे. माधव एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत संगणक अभियंता आहे. त्याला दोन महिन्यांपूर्वी कामावरुन काढून टाकण्यात आले होते. तो पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत होता. या कारणावरुन त्याची पत्नी आणि माधव यांच्यात वाद झाले होते. गुरुवारी दुपारी माधव घरात होता. मुलीला शाळेतून घेऊन येतो, असे सांगून तो तीन वर्षांचा मुलगा हिंमत याला घेऊन घराबाहेर पडला.
दरम्यान, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसमधून मुलगी घरी परतली. मात्र, माधव मुलीबरोबर आला नाही. रात्री उशिरा तिने चंदननगर पोलीस ठाण्यात पती आणि मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास करुन माधवला ताब्यात घेतले. तपासात त्याने तीन वर्षांचा मुलगा हिंमत याचा खून केल्याची कबुली दिली.
माधवला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. त्याने स्वत:च्या मुलाचे अपहरण करुन त्याचा खून केला. त्याने चाकू कोठून आणला, यादृष्टीने तपास करायचा आहे. त्याने गुन्हा करताना वापरलेली दुचाकी जप्त करायची आहे. मुलाचा खून केल्यानंतर त्याने अंगावरील कपडे कोठे टाकून दिले ? यादृष्टीने तपास करायचा असल्याने तपासासाठी पोलीस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील दिलीप गायकवाड यांनी युक्तिवादात केली. न्यायालायने माधवला २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक स्वाती खेडकर तपास करत आहेत.