‘तरुणांनो फक्त संगणक शिकून उपयोग नाही, तर दुसऱ्या हाती बंदूक घ्या,’ असे वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी रविवारी केले. भारती विद्यापीठाच्या वर्धापनदिन समारंभात भारत आणि चीनमधील घुसखोरीचा संदर्भ देत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
भारती विद्यापीठाच्या विसावा वर्धापनदिन रविवारी साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर, युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी, समाजशास्त्राचे अभ्यासक डॉ. उत्तम भोईटे यांना ‘भारती विद्यापीठ विश्वविद्यालय जीवन साधना गौरव पुरस्कार’ देण्यात आला. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम, कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजित कदम, कार्याध्यक्ष डॉ. आनंदराव पाटील, कुलसचिव जी. जयकुमार आदी उपस्थित होते.
यावेळी गोखले म्हणाले, ‘चीन आणि पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी पाहून मी धास्तावलो आहे. तरुणांनी आता फक्त संगणक शिकून उपयोग नाही, तर हातात बंदूकही घ्यायला हवी. बचावासाठी आता स्त्रियांनीही बंदूक घ्यायला हवी.’ डॉ. पटेल म्हणाले, ‘तंत्रज्ञानाचे महत्त्व कुणीच नाकारलेले नाही. मात्र, एक संवेदशील व्यक्ती, नागरिक घडण्यासाठी कला शिक्षणही महत्त्वाचे आहे. शिक्षणसंस्थांनी चांगले नागरिक घडवण्यावर भर द्यावा.’ यावेळी डॉ. सप्तर्षी म्हणाले, ‘माणसातील अंतर वाढते आहे. हे अंतर वाढले की माणुसकीचा लोप होतो. माणसाने धर्मचिन्हांचा आधार घेतला की तो काही तरी लपवतो आहे, असे समजावे. सर्व धर्म माझे म्हणण्याची तयारी हवी.’

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Computer firearm vikram gokhale bharati vidyapeeth