महापालिका शाळांच्या सफाईच्या ठेक्याची मुदत संपूनही संबंधित तीन ठेकेदारांना थेट पध्दतीने पुन्हा मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. आयुक्त राजीव जाधव यांनी हा प्रस्ताव मागे घ्यावा, अन्यथा, पालिकेच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करू, असा इशारा तीन नगरसेविकांनी दिला आहे.
पालिकेच्या १८ माध्यमिक शाळा, क्रीडा प्रबोधनी आणि १३४ प्राथमिक शाळांच्या स्वच्छतेचे काम खासगी ठेकेदारांकडे आहे. त्यापैकी तीन ठेकेदारांची मुदत ३० नोव्हेंबर २०१४ ला संपली आहे. तरीही पुढील कार्यवाही न करता त्याच ठेकेदारांना पुन्हा मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या स्थायीच्या सभेसमोर आहे. हे तीनही ठेकेदार राष्ट्रवादीच्या िपपरीतील एका नेत्याशी संबंधित आहेत. त्यामुळे निविदा न काढता थेट पध्दतीने मुदतवाढ देण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप नगरसेविका सीमा सावळे, आशा शेंडगे, शारदा बाबर यांनी केला आहे. नगरसेवक तसेच त्याच्याशी संबंधित नातेवाईकाला पालिकेचे कंत्राट घेता येत नाही. तरीही शाळांच्या स्वच्छतेचे काम देताना राष्ट्रवादी नेत्याच्या नातेवाईकावर अधिकारी मेहेरबान झाले आहेत, याकडे या नगरसेविकांनी लक्ष वेधले आहे. हा प्रस्ताव मागे न घेतल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
संगणक खरेदीतही संगनमत?
पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ७० संगणक थेट पध्दतीने खरेदी करण्यात येणार आहेत. बाजारात २५ ते ३० हजाराला असलेला संगणक महापालिका ४० हजाराला घेणार आहे, त्यामागे पुरवठादार, सत्ताधारी नेते व अधिकारी यांचे संगनमत असल्याचा आरोप नगरसेविका सीमा सावळे यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा