पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीतील पदवीधर गटाच्या निवडणुकीत मतदान होऊ नये म्हणून जाणीवपूर्वक दूरची मतदान केंद्रे देण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या महाविकास आघाडीच्या सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेलतर्फे संकल्पनामा प्रसिद्ध करण्यात आला असून, सोयी सुविधांनी युक्त असलेले एक हजार विद्यार्थ्यांसाठीचे वसतिगृह, चोवीस तास वैद्यकीय सुविधा, शिष्यवृत्ती, शुल्कवाढ रोखण्यासाठी प्रयत्न आदी मुद्द्यांचा समावेश संकल्पनाम्यात आहे.
अधिसभा निवडणुकीचा संकल्पनामा शुक्रवारी पत्रकार परिषदेत प्रसिद्ध करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, कुलदीप आंबेकर, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, युवा सेनेचे राजेश पळसकर, आकाश झांबरे, सुषमा सातपुरे, शिल्पा भोसले आदी या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा: क्रिकेट सामना पाहणाऱ्या तरुणांना बेदम मारहाण; येरवडा भागातील घटना
जगताप यांनी विद्यापीठातील गेल्या पाच वर्षांतील कारभाराबाबत टीका केली. मागच्या पाच वर्षांत कुलगुरू, कुलपती नावापुरतेच ठेवले. लेह-लडाखला फिरून झाले, पण केंद्र सुरू झाले नाही. विद्यापीठाच्या ठेवींची रक्कम घटली. शुल्कवाढ करण्याची वेळ विद्यापीठातल्या चाणक्यांवर आली. एककेंद्री कारभाराला विरोध करण्यासाठी सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेलद्वारे आव्हान दिले आहे. मात्र मतदान कमी होण्यासाठी जाणीवपूर्वक दूरची मतदान केंद्रे देण्यात आल्याचा आरोप जगताप यांनी केला.गेल्या पाच वर्षांतील भ्रष्टाचार उघडकीला आणण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या हिताच्या विरोधी निर्णय घेतले गेले. आता या कारभाराला विरोध करण्यात येईल, असे मोरे यांनी सांगितले.