शास्त्रीय कंठसंगीतामध्ये प्राचीन असलेल्या आग्रा घराण्याची गायकी रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ज्येष्ठ गायक-गुरु पं. बबनराव हळदणकर यांनी स्थापन केलेल्या ‘रसरंग गुरुकुल’ संस्थेतर्फे युवा गायकांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.
मानस विश्वरुप यांनी ‘पूरिया धनाश्री’ रागातील ‘बल बल जाऊ’ हा विलंबित ख्याल आणि रसपिया ऊर्फ पं. बबनराव हळदणकर यांच्या दोन द्रुत बंदिशी सादर केल्या. तर, उत्तरार्धात कविता खरवंडीकर यांनी ‘छाया बिहाग’ रागातील ‘सब निस जागी’ हा विलंबित त्रितालाचा ख्याल सादर केला. या रागातील ‘बेगी आवो मोरे मंदरवा’ ही जोडबंदिश रसपिया यांची होती. त्यानंतर ‘सुहा’ रागातील ‘एरी तू मान’ ही झपतालाची आणि ‘काहे मोसे छेडत’ या बंदिशी त्यांनी सादर केल्या. विकास भावे यांनी हार्मोनिअमची आणि धनंजय खरवंडीकर यांनी तबल्याची साथसंगत केली.  पं. बबनराव हळदणकर यांनी कलाकारांचा सत्कार केला. प्रसिद्ध गायक पं. सत्यशील देशपांडे आणि डॉ. विकास कशाळकर या प्रसंगी उपस्थित होते.