लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : तापमानवाढीमुळे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत देण्याचा प्रस्ताव प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालकांनी शालेय शिक्षण विभागाला सादर केला होता. या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असून, येत्या सोमवारपासून (२२ एप्रिल)) विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत मिळणार आहे.

शाळेतील उपस्थितीबाबत सवलत देण्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालकांना सूचना दिल्या. गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमान वाढले आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना २२ एप्रिलपासून शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत देण्यात येत आहे.

आणखी वाचा- देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!

तसेच राज्यातील इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याबाबत सवलत देण्याच्या अनुषंगाने शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा. या सूचनांचे पालन होण्याबाबतची दक्षता प्राथमिक शिक्षण संचालक, माध्यमिक शिक्षण संचालक यांनी घेण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Concession for students to attend school due to highest temperature in state pune print news ccp 14 mrj
Show comments