भूमिगत केबल टाकण्यासाठीच्या शुल्कात वीज वितरण कंपनीला सूट देण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीने मंगळवारी घेतला. या निर्णयानुसार वीज कंपनीला आता २,६०० रुपये प्रतिमीटर ऐवजी २,००० रुपये प्रतिमीटर या दराने शुल्क भरावे लागेल. शुल्क कमी करण्यात आल्यामुळे पुणे शहरातील विजेच्या कंपनीला आता वाढ करावी लागणार नाही.
स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. केबल टाकण्यासाठी सध्या १,५०० रुपये प्रतिमीटर या दराने शुल्क आकारले जाते. हे शुल्क २,६०० रुपये करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला होता. या दराने वीज वितरण कंपनीसह टेलिफोन / मोबाईल कंपन्यांकडूनही आकारणी केली जाणार होती. मात्र, या दराला वीज वितरण कंपनीचा आक्षेप होता. कंपनीतर्फे पुणे शहरातील वीज वितरणासंबंधीच्या पायाभूत सुविधांचा विकास केला जाणार असून त्यासाठी इन्फ्रा-२ हा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे.
या प्रकल्पात मुख्यत: वीज वाहून नेणाऱ्या केबल भूमिगत करण्याच्या कामाचा समावेश आहे. मात्र, महापालिकेने शुल्कात मोठी वाढ केल्यास हा प्रकल्प रद्द करावा लागेल किंवा पुण्यासाठीच्या वीजदरात वाढ करावी लागेल, असे कंपनीचे म्हणणे होते. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी अखेर शुल्क कमी करण्याबाबत चर्चा होऊन हे शुल्क २,००० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला.