मेट्रोकडून कामाच्या ठिकाणी लावलेल्या लोखंडी जाळ्यांमुळे (बॅरिकेटिंग) वाहतुकीचा वेग संथ होऊन वाहतूक कोंडी होत आहे. काम सुरू नसताना आणि आवश्यकता नसतानाही मेट्रोकडून ठिकठिकाणी लोखंडी जाळ्या लावण्यात आल्याने मेट्रोवर कारवाई का करण्यात येऊ नये, असा खुलासा मागविण्याचा निर्णय महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पाहणी दौऱ्यात घेण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पुणे: पोलीस ठाण्यामध्ये येणाऱ्या नागरिकांशी सौजन्याने वागा ; पोलीस महासंचालकांचे आदेश

शहरात महामेट्रो आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यामार्फत मेट्रो प्रकल्पाची कामे सुरू आहेत. तसेच काही ठिकाणी उड्डाणपूल तसेच अन्य विकसनाची कामे सुरू आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर कामांमुळे होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासंदर्भात पोलीस आणि महापालिका अधिकारी यांचा संयुक्त पाहणी दौरा आयोजित करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार शहराच्या विविध भागातील कामांची पाहणी पोलीस आयुक्त अभिनव गुप्ता, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शुक्रवारी केली. जागा पाहणीवेळी काही सूचनाही संबंधित यंत्रणांना पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या. या सूचनांमुळे शहरातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होईल, असा दावा पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला.

हेही वाचा >>>पुणे: दहावी-बारावीचे परीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

शहरात मेट्रोची अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत. मेट्रोचे काम ज्या ठिकाणी सुरू आहे, त्या ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे लोखंडी जाळ्या लावाव्यात. मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पडलेले सर्व खड्डे, चेंबर्स समपातळीत आणण्याची कार्यवाही मेट्रोने करावी. तसे त्यांना कळविण्यात यावे. आवश्यकता नसताना लोखंडी जाळ्या लावण्यात आल्याने वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मेट्रोवर कारवाई का करण्यात येऊ नये, याचा खुलासाही मागविण्याचा निर्णय पाहणी दौऱ्यात घेण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.दरम्यान, विकसनाचे काम सुरू असलेल्या रस्त्यावर आणि लोखंडी जाळ्या लावलेल्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला वाहने उभी करण्यासही मनाई करण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तशी सूचना महापालिकेकडून पोलिसांना करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>वसंत मोरे : जनतेच्या मनातील नेता

पर्यायी रस्ते पूर्ण करण्याची सूचना
सेनापती बापट रस्ता ते पाषाण रस्त्याला जोडणारा माॅडर्न हायस्कूलमधून जाणारा पर्यायी रस्ता १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात यावा. चांदणी चौकातील सेवा रस्त्याचे काम आणि उड्डाणपुलाच्या समांतर रस्त्याचे काम दहा दिवसांत पूर्ण करावे. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने सहा महिन्यांत चांदणी चौकातील सर्व विकसनाची कामे पूर्ण करावीत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. नवले पूल परिसरातील रम्बलर, कॅमेऱ्यांची पाहणी करण्यात आली. वाहतुकीची बेटे (चॅनेलायझर) वाढविण्याची सूचना करण्यात आली. सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने अनधिकृत पार्किंग आणि अतिक्रमणांवर कारवाई करण्याची सूचना करण्यात आली असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conclusion regarding traffic congestion during the inspection tour of municipal commissioner police commissioner pune print news amy
Show comments