पुण्याच्या चिखली भागात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ऑटोमोबाईल कंपनीच्या कँटीनमध्ये ग्राहकांसाठी तयार करण्यात आलेल्या सामोशांमध्ये चक्क कंडोम, गुटखा आणि खडे आढळल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणात संबंधित केटरिंग सेवा पुरवठादार कंपनीच्या संचालकांनी केलेल्या तक्रारीला अनुसरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी यासंदर्भात पुढील तपास सुरू केला आहे.
नेमकं घडलंय काय?
चिखली पोलीस स्थानकात यांदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार औंध परिसरात कार्यालय असणाऱ्या केटरिंग कंपनीच्या संचालकांनी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी आता संबंधित संशयित व्यावसायिकाविरोधात कारवाई होण्याची शक्यता आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं असून त्यानुसार २७ मार्च रोजीची ही घटना आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन आठवड्यांपूर्वी चिखली येथील एका मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीच्या कँटीनमध्ये सामोशामध्ये कंडोम, गुटखा आणि पानमसाला आढळून आला. त्याचबरोबर काही सामोशांमध्ये खडीही दिसून आली. यासंदर्भात तेथील केटरिंग कंपनीनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
सामोसामध्ये कंडोम आले कसे?
हा सगळा व्यावसायिक शत्रुत्वाचा प्रकार असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलीस तपासानुसार, या कंपनीच्या कँटीनसाठीचं कंत्राट एका केटरिंग कंपनीला देण्यात आलं होतं. या कंपनीनं त्याचं उपकंत्राट एका स्थानिक व्यावसायिकाला दिलं. पण काही दिवसांपूर्वी सामोशामध्ये एक वापरलेली बँडेज पट्टी सापडली. त्यानंतर या व्यावसायिकाचं उपकंत्राट रद्द करून ते दुसऱ्या एका व्यावसायिकाला देण्यात आलं.
आकर्षक क्रमांकासाठी पुणेकरांचा होऊ दे लाखोंचा खर्च! जाणून घ्या सर्वांत महागडे क्रमांक…
पण आधीच्या व्यावसायिकानं मनात राग ठेवून आपल्या दोन व्यक्तींना नव्या व्यावसायिकाकडे काम करण्यासाठी पाठवलं. यातून त्याचा व्यवसाय बंद पाडण्याचा त्याचा कट होता. त्यांनी नव्या व्यावसायिकाचं उपकंत्राट रद्द व्हावं म्हणून सामोसामध्ये या गोष्टी त्यांनी टाकल्या होत्या, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला अटकही केली आहे. एकूण पाच व्यक्तींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यात आधीच्या व्यावसायिकाकडील ३ व्यक्ती आणि नव्याने उपकंत्राट दिलेल्या व्यावसायिकाकडे पाठवलेल्या २ व्यक्ती यांचा समावेश आहे.