आरोग्य सेवांविषयी चर्चा घडवून आणण्यासाठी सिंबायोसिसतर्फे परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत रुग्णालये व आरोग्य सेवांचे व्यवस्थापन, न्यायवैद्यक यंत्रणा आणि वैद्यकीय संशोधन या विषयांवर तज्ज्ञ आपली मते मांडतील. २ आणि ३ मे रोजी सिंबायोसिसच्या लवळे येथील संकुलात ही परिषद होईल.
संस्थेतर्फे पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. सिंबायोसिस विद्यापीठाच्या उपकुलगुरू डॉ. रजनी गुप्ते यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होईल. आरोग्य सेवेच्या क्षेत्रातील यशस्वी ‘मॉडेल्स’, आरोग्य सेवेतील धोरणांचे व्यवस्थापन, रुग्णालयातील कर्मचारी वर्गाच्या व्यवस्थापनातील आव्हाने, वैद्यकीय विषयांशी निगडित कायदे, न्यायवैद्यक प्रकरणांमधील महत्त्वाचे निकाल अशा विविध विषयांवर परिषदेत चर्चा होणार आहे. याबरोबरच आरोग्य विम्यामधील संधी आणि आव्हाने, रुग्णालय मानांकन आणि आरोग्य क्षेत्रातील गुणवत्ता, मेडिकल टूरिझम, आरोग्य सेवेतील ‘फ्रँचाइझिंग’, ‘फार्माकोव्हिजलन्स’, वैद्यकीय संशोधन या विषयांनाही स्पर्श केला जाईल.
३ तारखेला फोर्टिस होल्थकेअर लिमिटेडचे कार्यकारी उपाध्यक्ष शिविंदर मोहन सिंग, माजी केंद्रीय कायदेमंत्री अॅड. राम जेठमलानी आणि सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजूमदार यांच्या उपस्थितीत परिषदेचा समारोप करण्यात येईल.