विद्याधर अनास्कर
Loksatta Pune Vardhapan 2023 : बँकिंग क्षेत्रात होत असलेली डिजिटल क्रांती, त्यानुसार ग्राहकांना हवी असणारी व्यक्तिगत सेवा व त्यानुसार बदलत असणाऱ्या त्यांच्या अपेक्षा, बँकिंग क्षेत्राबाबतचे रिझर्व्ह बँकेचे धोरण, युवकांचे वाढते प्रमाण, पुण्यातील नागरिकांची चौकस बुद्धी, पोस्ट पेमेंट बँकांचे आगमन या सर्व पार्श्वभूमीवर येत्या २५ वर्षांतील पुण्यातील बँकिंग क्षेत्राचे चित्र बरेच बदललेले असेल हे निश्चित.
हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : पाणी प्रश्नाचे उत्तर आपणच शोधण्याची गरज!
गेल्या कित्येक वर्षांपासून बँक ग्राहकांच्या बँकिंग क्षेत्राकडून फक्त बेसिक व्यवहाराच्या अपेक्षा आहेत, त्यामध्ये आपले बँक खाते चालविणे, मुदत ठेव ठेवणे, गृह अथवा वाहन कर्ज लवकर उपलब्ध होणे इ. या सर्व व्यवहारांमध्ये बँकांचा व्याजदर हा कळीचा मुद्दा ठरलेला होता. परंतु आता परिस्थिती बदलत आहे. बँकिंग व्यवहारातील युवकांचा सहभाग वाढत आहे. सन २०२० च्या आकडेवारीनुसार भारतीयांचे सरासरी वय २९ आहे. जगातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेल्या चीनमधील नागरिकांचे वय ३७ तर जपानमधील नागरिकांचे वय तब्बल ४८ आहे. भारतातील ५०% जनतेचे सरासरी वय ५० आहे. या पार्श्वभूमीवर भारताला तरुणांचा देश म्हटले जाते. पुणेही त्याला अपवाद नाही. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये शिक्षणासाठी आलेल्या तरुणांचा भरणादेखील लक्षणीय आहे. ही तरुण मंडळी आधुनिक तंत्रज्ञानाशी परिचित असल्याने त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी बँकिंग व्यवसाय भविष्यात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करणार हे उघड आहे.
हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : भविष्यातील सर्वोत्तम शहर
आज घराघरात इंटरनेट सुविधा आहे. त्याचा वापर करण्याकडे कल वाढत आहे. त्यामुळे ’निओ बँकिंग’ चे युग अवतरु लागले आहे. बँकेमध्ये प्रत्यक्ष न जाता ऑनलाईन व्यवहार करण्यास पसंती मिळत आहे. मोबाइलमधील विविध ‘ॲप’ च्या माध्यमातून यापूर्वीच पैशाचे हस्तांतरण, कर्ज सुविधा व घरबसल्या सर्व आर्थिक सुविधा देण्याची चढाओढ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जसे मोठ्या सिनेमागृहांच्या जागी मिनी थिएटर्स सुरू झाली तसे बँकांच्या मोठ-मोठ्या इमारतींच्या जागी कमीत कमी क्षेत्रफळ धारण केलेल्या बँकांच्या छोट्या-छोट्या शाखांची संख्या वाढलेली दिसेल, या शाखा आर्थिक व्यवहारांबरोबरच सुविधा केंद्रे म्हणून जास्त परिणामकारक काम करताना दिसतील. बँकांमधील कर्मचारी वर्ग कमी होऊन त्यांची जागा तंत्रज्ञानावर आधारित ॲटोमॅटिक मशिन्स घेतील. एखादी परदेशी बँक पूर्णत: कर्मचारी विरहित ॲटोमेटेड ब्रँच सुरू करेल. परदेशात अशा कर्मचारी विरहित बँकांच्या शाखा सन २०१४ पासूनच कार्यरत आहेत.
हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : पुणेरी सांस्कृतिकपण
तळागाळातील जनतेला बँकिंग व्यवहारांची सवय लागावी, त्यांच्याकडील अनुत्पादक पैसा अर्थव्यवस्थेत यावा म्हणून पूर्वी केंद्र सरकारने ‘लहान, परंतु अनेक बँका’ हे धोरण स्वीकारले होते. परंतु मुक्त अर्थव्यवस्थेत आर्थिकदृष्ट्या सक्षम बँकांची गरज लक्षात घेऊन सन २००५ पासून केंद्र सरकारने ‘मोठ्या, परंतु संख्येने कमी बँका’ हे धोरण स्वीकारल्याने रिझर्व्ह बँकेने त्या अनुषंगाने बँकांच्या विलीनीकरणाचे धोरण स्वीकारले आहे. या धोरणास पुढील २५ वर्षांत निश्चितच गती मिळून अनेक लहान बँकांचे विलीनीकरण अथवा एकत्रीकरण झाल्याचे पुणेकरांना दिसेल. या धोरणाचा सर्वांत जास्त फटका पारंपरिक बँकिंग करणाऱ्या पुण्यातील नागरी सहकारी बँकांना बसेल हे निश्चित. तरीही ‘जुने ते सोने’ असे म्हणत आपले वेगळेपण जपणाऱ्या पुणेकरांच्या स्वभावानुसार आर्थिक सक्षमतेच्या जीवावर काही सहकारी बँका आपले पारंपरिक बँकिंग सुरूच ठेवतील. सन १९२४ साली सुरू झालेले पहिले अमृततुल्य पुण्यातील लक्ष्मी रोडवरील सोन्या मारुती चौकात आजही दिमाखात आपले वेगळेपण जपत उभे आहे.
सध्या बँका आपल्या व्यवसायवृद्धीसाठी विविध योजना आखताना दिसतात. आपल्या गरजेनुसार बँकांचे ग्राहक त्या निवडताना दिसतात. परंतु भविष्यात मात्र बँका आपल्या व्यक्तिगत ग्राहकाची स्वतंत्र गरज लक्षात घेऊन प्रत्येकासाठी वेगवेगळ्या व स्वतंत्र योजना आखताना दिसतील. त्यामुळे व्यक्तिगत ग्राहकांच्या विशिष्ट बँकिंग गरजा लक्षात घेऊन त्याच्यासाठी ’टेलर-मेड’ आर्थिक सेवा पुरविण्याचे युग सुरू होईल. त्यामध्ये तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर होईल हे वेगळे सांगायला नको.
हेही वाचा– Loksatta Pune Vardhapan Din 2023 : पुणेरी सांस्कृतिकपण
अशावेळी फक्त ठेवी स्वीकारणे व कर्ज देणे इतक्या पुरतीच बँकांची सेवा मर्यादित न राहता, त्या ग्राहकाला त्याची गुंतवणूक, विमा, आवश्यकतेनुसार कर्ज इत्यादी सर्व सुविधा व्यक्तिगत स्वरूपात पुरविल्या जातील. त्यामुळे पुढील काळात बँका आपल्या ग्राहकांच्या आर्थिक सल्लागार म्हणून काम पाहतील. ‘निओ बँकिंग’ मुळे पेपरलेस बँकिंगचे युग सुरू होईल. ग्राहकाला एका मिनिटात केवळ फोनवर आपले खाते उघडता येईल. सेंट्रलाईज्ड के.वाय.सी. रजिस्ट्रिमुळे व्यवहारांमधील धोके कमी होतील. डिजिटल बँकिंग व्यवहारांमुळे वादाचे प्रसंग कमी होतील. या व्यवहारांवर युवा वर्गाचे वर्चस्व राहील.
खासगी क्षेत्राला प्राधान्य देण्याच्या सरकार व रिझर्व्ह बँकेच्या धोरणांनुसार व्यापारी तत्त्वांवर चालणाऱ्या स्मॉल फायनान्स बँकांची संख्या वाढेल. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या लहान नागरी सहकारी बँकांचे रूपांतर स्मॉल फायनान्स बँकांमध्ये होईल. एकत्रीकरणाच्या धोरणांनुसार लहान नागरी सहकारी बँकांचे मोठ्या सक्षम सहकारी बँकांमध्ये विलीनीकरण होईल. रिझर्व्ह बँकेच्या धोरणांनुसार मोठ्या सहकारी बँका व्यवसायवृद्धीसाठी व्यापारी तत्त्वांवर कार्यरत राहण्याचा मार्ग स्वीकारण्यास प्रवृत्त केल्या जातील. यामुळे सहकारी बँकिंगची संस्कृती एकदम नष्ट होणार नाही. परंतु तिला ग्रहण लागेल हे निश्चित. ‘सामाजिक बँकिंग’ च्या संकल्पनेचा ऱ्हास होण्यास सुरुवात होऊन व्यापारी तत्त्वावरील बँकिंग प्रणालीचा स्वीकार या क्षेत्राने केलेला दिसेल.
मोबाइल क्रांतीमुळे आज जसा प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाइल दिसतो, तसेच आज प्रत्येक लहान दुकानांमधून आपणांस क्यू.आर. कोडच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट होताना दिसत आहे. रोखीचे व्यवहार कमी होताना दिसत आहेत. पुढील २५ वर्षांच्या काळात यामध्ये निश्चितच नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे आर्थिक व्यवहार अत्यंत जलद होतील व पेपर मनीचा वापर हळूहळू घटताना दिसेल. तंत्रज्ञानातील प्रगतीबरोबरच बँकिंग क्षेत्रातील सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली दिसेल.
हेही वाचा- “मी एक लाख मतांनी निवडणूक जिंकणार”, भाजपा उमेदवार अश्विनी जगताप यांनी व्यक्त केला विश्वास
अशा गुन्ह्यांमधील रक्कम मोठी असल्याने बँकिंग व्यवहारांमधील धोके वाढतील, ते कमी करण्यासाठी तपास यंत्रणांनादेखील आधुनिक व्हावे लागेल. अशा गुन्ह्यांचा जास्तीत जास्त फटका आधुनिक तंत्रज्ञानामध्ये साक्षर नसलेल्या सामान्यांनाच बसेल, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आधुनिक बँकिंगबरोबरच पुणेकर पारंपरिक बँकिंगही सुरू ठेवतील, परंतु त्याचा वापर करणाऱ्या ग्राहकांची वयोमर्यादा निश्चितच सरासरी ६५ वर्षाच्या वर असेल. यामुळे भविष्यात येऊ घातलेल्या डिजिटल करन्सीबरोबरच सध्याच्या चलनातील व्यवहार देखील सुरूच राहतील हे निश्चित.
आज पुण्यामध्ये राष्ट्रीयीकृत, खासगी, व्यापारी, सहकारी, नॉन बँकिंग संस्था, पतसंस्था इत्यादी विविध आर्थिक संस्था ग्राहकांच्या आर्थिक गरज भागविताना दिसतात. त्यामध्ये पेमेंट बँका, पोस्ट ऑफिसची पेमेंट बँक, स्मॉल फायनान्स बँका इ. ची भर पडत असल्याने निश्चितच स्पर्धा वाढणार, स्पर्धेबरोबरच आपण जास्तीत जास्त चांगली सेवा कमीत कमी शुल्कात देतो असे दाखविण्यासाठी ‘जगलरी’ चा आधार घेतला जाणार, या पार्श्वभूमीवर भविष्यात पुणेकरांना जास्तीत जास्त बँकिंग साक्षर व्हावे लागेल हे निश्चित.
v_anaskar@yahoo.com