काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना आघाडी सरकारने पिंपरीतील स्वस्तातील घरे देणाऱ्या घरकुल प्रकल्पाच्या जागेसाठी लागणारे ११४ कोटी रुपये माफ करण्याचा निर्णय झाला आणि तोही भाजपचे नेते व विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे घेतला, असे सांगत शहर भाजपने त्याचे श्रेय घेतले. आनंदोत्सव साजरा करत नागरिकांना पेढे व साखरही वाटली. प्रत्यक्षात असा काही निर्णय झालाच नाही आणि झाला असेल तर आम्हाला तसे आदेश प्राप्त झालेले नाहीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
केंद्राच्या नेहरू अभियानाअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी स्वस्त घरकुल योजना राबवण्याची घोषणा पिंपरी पालिकेने केली. प्रकल्पातील सहा हजार ७२० घरांचा पहिला टप्पा चिखलीत होणार आहे. मात्र, नियोजित जागा प्राधिकरणाच्या ताब्यात आहे. ती जागा हवी असल्यास पालिकेने ११४ कोटी रुपये द्यावेत, अशी प्राधिकरणाची आग्रही मागणी आहे. तथापि, महापालिकेने नकारघंटा दिल्याने तंटा राज्य शासनाकडे गेला. बरेच दिवस त्यावर कोणताही निर्णय होत नव्हता. राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करत होते. त्याचवेळी भाजपकडून खडसे यांच्यामार्फत प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न सुरू होते. खडसेंनी अधिवेशनातील चर्चेत हा विषय मांडला, तेव्हा अखेरच्या दिवशी ही रक्कम माफ करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली, असा दावा भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ पवार यांनी प्रसिध्दिपत्रकाद्वारे केला. या निर्णयाबद्दल त्यांनी पिंपरीत आनंदोत्सव साजरा केला.
राष्ट्रवादीचे आमदार विलास लांडे यांनी सांगितले की, विधिमंडळात खडसे यांनी या विषयावर चर्चा घडवून आणली. मात्र, निर्णय झाला नव्हता. या संदर्भात, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी मात्र असा काही निर्णय झाला नसल्याचे सांगत अशाप्रकारचा निर्णय झाल्याचे पत्र अथवा कोणताही आदेश प्राधिकरणाला शासनाने दिला नाही, असे स्पष्ट केले. महापालिकेकडूनही अशीच प्रतिक्रिया देण्यात आली. तथापि, एकनाथ पवार आपल्या म्हणण्यावर ठाम असून मुख्यमंत्र्यांनी ११४ कोटी रुपये माफ करण्याचा निर्णय घेतला व त्याची नोंद सभावृत्तान्तात आहे. लांडे यांनी त्याची माहिती घ्यावी, अशी टिपणी केली.