लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : केंद्र सरकारने आयात शुल्कात सवलत देऊन किंवा आयात शुल्क पूर्णपणे हटवून दूध पावडर, मका, पॉपकॉर्न, मोहरी तेल आणि सूर्यफूल तेल आयातीचा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्षात ही आयात कधी होणार, होणार की नाही आणि आयातीमुळे देशांतर्गत बाजारावर काय परिणाम होईल, या बाबत संभ्रमावस्था आहे.

केंद्र सरकारच्या परकीय व्यापार विभागाच्या महासंचालक कार्यालयाने जारी केलेल्या नोटिशीनुसार, १० हजार टन दूध भुगटी, ४ लाख ९८ हजार ९०० टन मका, ११०० टन पॉपकॉर्न, कच्चे सूर्यफूल तेल १ लाख ५० हजार टन आणि रिफाईंड मोहरी तेल (कॅनोला) १ लाख ५० हजार टन आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. शुल्कात सवलत देऊन किंवा शून्य आयात शुल्काने ही आयात होणार आहे.

आणखी वाचा-तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; ग्यानबा तुकारामाच्या गजराने देहू दुमदुमून निघाली

शेतीमालाच्या बाजारभावाचे अभ्यासक श्रीकांत कुवळेकर म्हणाले, केंद्र सरकारने फक्त धोरणात्मक पाऊल म्हणून आयातीला परवानगी दिली आहे. प्रत्यक्षात आयात होण्याची शक्यता कमी आहे. तुटवड्याच्या काळात किंवा अगदीच आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तरच आयात होईल. प्रामुख्याने पोल्ट्री खाद्य, इथेनॉल उत्पादन आणि औद्योगिक वापरासाठी पॉपकॉर्नची आयात होऊ शकते. दीड लाख टन सूर्यफूल आणि दीड लाख टन मोहरी तेल ही अत्यंत किरकोळ आयात आहे. कारण देशात दरवर्षी सरासरी १५० ते १६० लाख टन आयात होत असते. देशात अत्यंत चागल्या दर्जाच्या मोहरी तेलाचे उत्पादन होते. त्यामुळे आयात होणाऱ्या कमी प्रतीच्या कॅनोला तेल खाण्यासाठी वापरले जाण्याची शक्यता कमी आहे.

दूध पावडरच्या आयाती बाबत बोलताना दूध उद्योगाचे अभ्यासक प्रकाश कुतवळ म्हणाले, केवळ महाराष्ट्राचा विचार करता राज्यात आजघडीला सुमारे साडेतीन लाख टन दूध पावडर चांगल्या दराअभावी पडून आहे. राज्यात दूध पावडरचा दर सरासरी २१० ते २५० रुपये किलो दरम्यान आहे. इतक्या कमी दराने दूध पावडर आयात होण्याची शक्यता कमी आहे. दहा हजार टन भुगटी आयात झालीच तर ती अत्यंत तोकडी असेल. त्यामुळे आयात झाली तरीही बाजारावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही.