महापालिकेची पंचवार्षिक मुदत संपून आठ महिने झाले, तरी आगामी निवडणुकांचे चित्र स्पष्ट होत नाही, यावरून राजकीय वर्तुळात संभ्रमावस्था कायम आहे. सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांमध्येही कमालीची अस्वस्थता आहे.पिंपरी-चिंचवड पालिकेची मुदत मार्च २०२२ ला संपली. निर्धारित कार्यक्रमानुसार त्यानंतरच्या काही दिवसांत आगामी निवडणुका होणे अपेक्षित होते. तथापि, वेगवेगळ्या कारणास्तव गेल्या ८ महिन्यांत या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. आणखी किती दिवसांनी निवडणुका होतील, याविषयी खात्रीने काहीही सांगता येत नाही. त्यामुळे राजकीय पक्षांचे कामकाज तूर्त थंडावले आहे. वरिष्ठ पातळीवरून आलेल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याशिवाय खास निवडणुकांसाठी म्हणून कोणतेही उपक्रम, अभियान राबवण्याच्या मानसिकतेत स्थानिक राजकीय नेते नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पुणे : शहरातील २२५ रस्ते निकृष्ट ; २५ ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा पथ विभागाचा प्रस्ताव

महापालिकेच्या निवडणुका तीन सदस्यीय की चार सदस्यीय प्रभागपद्धतीनुसार, ओबीसी आरक्षणांचे काय, असे अनेक मुद्दे राजकीय पक्षांना भंडावत आहेत. तथापि, त्यावर सध्यातरी ठोस उत्तर कोणाकडे नाही. महापालिका निवडणुकांमध्ये स्थानिक समीकरणे महत्त्वाची ठरतात. त्यानुसार, बहुतांश इच्छुक उमेदवार आपआपल्या उमेदवारीबाबतचा निर्णय घेत असतात. सध्या काहीच स्पष्ट नसल्याने त्यांच्यासमोर पेच आहे. पिंपरी महापालिकेच्या आखाड्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट सामना होणार असल्याचे चित्र सुरुवातीपासून आहे. निवडून येण्याची क्षमता असणारे उमेदवार मिळावेत, यासाठी दोन्हीही पक्षांच्या नेत्यांचे कसून प्रयत्न सुरू आहेत. सध्याच्या संभ्रमावस्थेमुळे कोणत्या पक्षाकडे उमेदवारीसाठी जायचे, असा प्रश्न उमेदवारांसमोरही आहे.दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाकडून अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोग पालिका निवडणुकांबाबत निर्णय घेईल, असे राज्य शासनाकडून अलीकडेच स्पष्ट करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confusion over pimpri chinchwad municipal elections pune print news amy
Show comments