पुणे : मराठी देवनागरी लिपीत पाकळीयुक्त ‘ल’ आणि देठयुक्त ‘श’ लिहिण्याचा नियम अडचणीचा ठरणार असल्याचा सूर शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांची वर्षांनुवर्षांची सवय मोडणे कठीण असून, या निर्णयाने हित साधले जाण्यापेक्षा गोंधळ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. वसंत काळपांडे यांनी नव्या नियमाबाबत संभाव्य गोंधळावर बोट ठेवले. ‘‘भाषेशी संबंधित नियम हे वापरसुलभ असायला पाहिजेत. स्वत:ला भाषातज्ज्ञ म्हणवून घेणाऱ्या मंडळींची मराठी बोलणाऱ्यांशी नाळ तुटली आहे. भाषेतील बदलांची दिशा तरुण पिढी ठरवत असते, भाषातज्ज्ञ नव्हे. त्यामुळे हा शासन निर्णय मराठी भाषेच्या दृष्टीने एक धोक्याची घंटा आहे. या निर्णयाने फायदा होण्यापेक्षा गोंधळच निर्माण होऊ शकतो’’, असे काळपांडे म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 आतापर्यंत वापरात असलेली प्रमाण देवनागरी लिपी कोणाच्या लहरीने आणलेली नव्हती. देशभरात देवनागरी लिपी वापरणाऱ्या सर्व राज्यांतील शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री यांच्या एकत्र सभा होऊन, राज्याराज्यात आणि केंद्र स्तरावर भरपूर विचारमंथन होऊन देशभरासाठी एक प्रमाण लिपी तयार करण्यात आली होती. त्याला महाराष्ट्रात झालेल्या लिपीसुधारणा प्रयत्नांची पार्श्वभूमी होती. प्रमाण लिपी तयार करण्यात मराठी मंडळींचा पुढाकार होता. त्यामागे लिपी देशभर सर्वाना समजावी, सुटसुटीत असावी असे लोकशाहीला साजेसे विचार होते. त्याकडे शासन निर्णयात पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले, याकडे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ धनवंती हर्डीकर यांनी लक्ष वेधले. अक्षरांचे वळण सक्तीने बदलावे अशी पूर्वीची अपेक्षा नव्हती. ते हळूहळू बदलत जाईल, जोडाक्षरे सोपी केल्याने त्यांचा वापर वाढण्याची अपेक्षा खरी ठरली. आता मात्र ताबडतोब बदल करण्याचे फर्मान आहे. त्यासाठी विद्यार्थी, शिक्षक यांना किती त्रास होईल, किती वेळ वाया जाईल आणि मुख्य म्हणजे हे सगळे करून काय फायदा होईल, याचा विचार केलेला नाही. गेल्या शतकातील मराठीच्या अभ्यासकांनी लोकांविषयीच्या तळमळीने आणि विचारपूर्वक बदल सुचवले, ते केंद्र स्तरावर मान्यही झाले, ते रद्द करणाऱ्या लोकांनी त्यासाठी आधी योग्य कारणे कोणती, यांची जाहीर चर्चा करायला हवी होती, असेही हर्डीकर यांनी सांगितले. मात्र, अ‍ॅ, ऑ अशी अक्षरे, चंद्रिबदू समाविष्ट करण्याचा निर्णय चांगला आहे. तो काळाशी सुसंगत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 विद्यार्थ्यांपर्यंत नेमका आशय पोहोचवणे हे शिक्षकाचे मुख्य काम असते. ते भाषेद्वारेच केले जाते. वर्णमाला, जोडाक्षरे आदी भाषेचाच भाग आहेत. मात्र, नव्या शासन निर्णयातील बदल अंगवळणी पडण्यास शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांनाही काही काळ अडचणी येतील. नियम लक्षात ठेवून नव्या पद्धतीने शिकवणे शिक्षकांसाठी महत्त्वाचे आहे, असे मराठीच्या शिक्षकांनी सांगितले.

झाले काय?

देवनागरी लिपीतील प्रमाणीकृत मराठी वणर्मालेचा, अक्षरमालेचा आणि अंकांचा शासनाने स्वीकार केल्याचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. त्यात  देठयुक्त ‘श’ आणि पाकळीयुक्त ‘ल’ हीच दृश्यरूपे प्रमाणरूपे म्हणून स्वीकारण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे. शासन निर्णयासह वणर्मालेच्या संदर्भातील स्पष्टीकरणे, विशिष्ट अक्षरांच्या लेखनाबाबत सूचना, जोडाक्षरे, वर्णक्रम, विरामचिन्हे, अंक, अंकांचे अक्षरलेखन या विषयीही सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या शासन निर्णयानुसार काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

‘श’ देठयुक्त आहे की गाठयुक्त, ‘ल’ पाकळीयुक्त आहे की दंडयुक्त याने काही बिघडत नाही. दोन्हीचा वापर योग्यच आहे.

– यास्मिन शेख, ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confusion rules education sector questioning benefits decision ysh