महापालिकेतील विरोधी पक्षनेता पद कायद्यातील तरतुदीप्रमाणे काँग्रेसलाच मिळाले पाहिजे, अशी आग्रही मागणी पक्षाच्या शिष्टमंडळाने बुधवारी मुख्यमंत्र्यांकडे केली. काँग्रेसचा गटनेता बदला ही राष्ट्रवादीने घेतलेली भूमिका अप्रस्तुत असून गटनेता पदावर अरविंद शिंदेच हवेत, ही बाबही नगरसेवक व आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे नोंदवली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोन नगरसेविकांची पदे रद्द झाल्यामुळे त्या पक्षाचे महापालिकेतील संख्याबळ २९ वरून २७ झाले आहे, तर काँग्रेसचे संख्याबळ २८ इतके आहे. त्यामुळे कायद्यातील तरतुदीनुसार विरोधी पक्षनेता या पदावर काँग्रेसने दावा केला आहे. काँग्रेसने अरविंद शिंदे यांच्याऐवजी अन्य कोणाला गटनेता या पदावर नियुक्त केल्यास काँग्रेसला विरोधी पक्षनेता पद देण्याची तयारी राष्ट्रवादीने दाखवली आहे. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर पक्षाच्या शिष्टमंडळाने बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर या परिस्थितीवर चर्चा केली.
पक्षाचे शहराध्यक्ष अभय छाजेड, आमदार विनायक निम्हण, रमेश बागवे, शरद रणपिसे, माजी आमदार चंद्रकांत छाजेड, गटनेता अरविंद शिंदे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे आणि पक्षाचे अठरा नगरसेवक या वेळी उपस्थित होते. महापालिकेतील दोन पदांसाठी होणाऱ्या निवडणुका, स्थानिक संस्था कराच्या विरोधात सुरू झालेला व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद यासह इतरही काही विषयांवर या वेळी चर्चा झाली.
कायद्यातील तरतुदीनुसार आणि संख्याबळानुसार विरोधी पक्षनेता हे पद काँग्रेसलाच मिळाले पाहिजे. मात्र, राष्ट्रवादीकडून त्याबाबत चालढकल सुरू आहे. तसेच शिंदे यांना बदलण्याबाबतही सांगितले जात आहे. हे चुकीचे असून महापालिकेत काँग्रेसचा प्रभाव पाडण्यासाठी शिंदे यांना या पदावर ठेवावे, अशी मागणी या वेळी झालेल्या चर्चेत करण्यात आली. काँग्रेस गटनेत्याबद्दल राष्ट्रवादीने कोणतीही अट न घालता हे पद काँग्रेसला द्यायला पाहिजे, असाही आग्रह या वेळी धरण्यात आला. या परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यायला सांगतो, असे आश्वासन या वेळी मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा