पिंपरी महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांचे मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत वर्षभरातील कामगिरीबद्दल अभिनंदन करण्यात आले. मात्र, हे अभिनंदन ‘पाडापाडी’ सोडून इतर कामासाठी आहे, असे सदस्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
स्थायी समितीचे अध्यक्ष नवनाथ जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आयुक्त परदेशींची वर्षपूर्ती व या कालावधीतील कामगिरीबद्दल विशेष अभिनंदन करण्यात आले. चंद्रकांत वाळके यांनी प्रस्ताव मांडला, त्यास सर्व सदस्यांनी अनुमोदन दिले. आयुक्तांनी अभिनंदनाचा स्वीकार करत आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना त्याचे श्रेय दिले. बैठकीतील निर्णयांची माहिती सदस्यांनी पत्रकारांना दिली, तेव्हा अनधिकृत बांधकामे पाडण्याबद्दल आयुक्तांचे अभिनंदन केले नाही तर उर्वरित चांगल्या कामाबद्दल तो सत्कार होता, असे आवर्जून स्पष्ट केले.
बैठकीत सदस्यांनी प्रशासनावर कडाडून हल्ला चढवला. नदीत जलपर्णी साचून राहिलेली आहे, तरी अधिकारी जलपर्णी नसल्याचे खोटेच सांगत आहेत, अशी तक्रार आशा शेंडगे, संगीता भोंडवे यांनी केली. संबंधित ठेकेदारांची बिले देऊ नका, अशी मागणी शेंडगे यांनी केली. तर, वाकड, किवळ्यात जलपर्णी तशीच आहे, असे भोंडवे यांनी निदर्शनास आणून दिले. क्रीडा प्रबोधनीतील खेळाडू विराज लांडगे व मोमीन शेख यांनी सुवर्णपदक मिळवले असून कबड्डीत आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी महेश लांडगे यांनी केली. नाल्यांवर घरे व कार्यालये थाटण्यात आली आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, अशी तक्रार सुनीता वाघेरे यांनी केली. तेव्हा आयुक्तांनी याविषयी निश्चित माहिती द्यावी, अशी सूचना केली व तशी माहिती प्राप्त झाल्यास कारवाई करू, अशी हमी दिली.
शहरातील पाण्याच्या टाक्या असुरक्षित
मोठय़ा प्रमाणात टाक्या असल्याने पिंपरी-चिंचवड म्हणजे टाक्यांचे शहर असे म्हटले जाते. मात्र, शहरातील जवळपास सर्वच पाण्याच्या टाक्या असुरक्षित आहे, याकडे सदस्यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. पाण्याची टाकी असलेल्या ठिकाणी अनेक गैरप्रकार चालतात, सर्रास जुगार खेळला जातो, असे सांगून टाक्यांना सुरक्षितता असली पाहिजे, अशी मागणी सदस्यांनी केली.
पिंपरी पालिका आयुक्तांचे ‘स्थायी’ त अभिनंदन; पण ‘पाडापाडी’ सोडून!
पिंपरी महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांचे मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत वर्षभरातील कामगिरीबद्दल अभिनंदन करण्यात आले. मात्र, हे अभिनंदन ‘पाडापाडी’ सोडून इतर कामासाठी आहे.
First published on: 29-05-2013 at 02:34 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congratulations by standing committee to commissioner but not for removing encroachment