नॅशनल हेराल्ड कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. मागील दोन दिवसांपासून राहुल गांधी यांना चौकीसाठी बोलावले जात आहे. आजदेखील त्यांना पुन्हा एकदा ईडीच्या कार्यालयात बोलावण्यात आलं आहे. याच कारणामुळे राजधानी दिल्लीसह देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. काँग्रेस पक्षाचे नेते तथा कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी निदर्शने केले जात आहेत. या निदर्शनांचं लोण पुण्यापर्यंत पोहोचलं आहे.
पुण्यात काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. येथील बालगंधर्व रंगमंदिर चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी टायर पेटवून निषेध नोंदविला. या आंदोलनाचे नेतृत्व शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकार तसेच भाजपाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच येथे टायर पेटवून ईडीच्या कारवाईचा निषेध नोंदवण्यात आला.
हेही वाचा >>> पंतप्रधान मोदींसमोरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपाल कोश्यारींना दिली ‘एक्सचेंज ऑफर’; म्हणाले, “फार मोठं आणि…”
या आंदोलनादरम्यान, काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यकर्त्यांनी ईडी, भाजपा आणि मोदी सरकारविरोधात घोषणा दिल्या. भाजपा हमसे डरती है, ईडी को आगे करती है अशा प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा येथे तैनात करण्यात आला होता.
हेही वाचा >>> “…ही हुकूमशाहीची सुरुवात नाही, टोक आहे”, ईडी कारवाईवरून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
दरम्यान, राहुल गांधी यांना आज पुन्हा एकदा चौकशी करिता बोलवण्यात आलं आहे. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीतील ईडी कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केलं आहे. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येत, ईडी कार्यालयाबाहेर टायर्स जाळले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी काँग्रेसच्या काही नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.