विरोधी पक्षांकडून; विशेषत: भारतीय जनता पक्षाकडून होणारा सोशल मीडियाचा वापर लक्षात घेऊन काँग्रेसनेही या माध्यमावर लक्ष केंद्रित केले आहे. सोशल मीडियावर सुरू असलेला अपप्रचार थांबवून योग्य माहिती जनतेपर्यंत जावी यासाठी काँग्रेसतर्फे सोशल मीडिया प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी बुधवारी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेस कार्यकर्त्यांसह सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या युवकांना या शिबिरांमध्ये प्रशिक्षण देण्याची योजना असल्याचे सावंत यांनी सांगितले. या उपक्रमातील पहिले शिबिर शुक्रवारी (४ ऑक्टोबर) पुण्यात होत असून सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच या वेळेत बालगंधर्व रंगमंदिरात या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीच्या जनसंपर्क विभागात काम करणाऱ्या तज्ज्ञांचा चमू या शिबिरात येणार असून त्यांच्यातर्फे उपस्थितांना मार्गदर्शन केले जाईल. ठाणे (६ ऑक्टोबर), नाशिक (१८ ऑक्टोबर), औरंगाबाद (२० ऑक्टोबर), नागपूर (२५ ऑक्टोबर) येथेही सोशल मीडिया प्रशिक्षण शिबिरे घेतली जाणार असल्याची माहिती सावंत यांनी दिली.
विरोधी पक्षांकडून सोशल मीडियाचा वापर चुकीच्या पद्धतीने होत असून योग्य माहिती तसेच सरकारच्या योजना, लोककल्याणकारी कार्यक्रम यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या माध्यमाचा वापर करण्याचे नियोजन आहे. या माध्यमाचा वापर सकारात्मक भूमिका मांडण्यासाठी देखील करता यावा याचे प्रशिक्षण या शिबिरांमध्ये दिले जाईल. लवकरच राज्यात इतर जिल्ह्य़ांमध्येही या शिबिरांचे आयोजन करण्याची योजना आहे, असेही ते म्हणाले.

Story img Loader