काँग्रेसचा एकशे अठ्ठाविसावा वर्धापनदिन शहर काँग्रेसतर्फे विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार असून त्या निमित्ताने आयोजित मुख्य कार्यक्रमात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असेल.
काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांची माहिती देताना छाजेड म्हणाले, की शहर काँग्रेसचा मुख्य कार्यक्रम वर्धापनदिनी; २८ डिसेंबर रोजी काँग्रेस भवनाच्या प्रांगणात होणार आहे. लोकमान्य टिळक, नामदार गोखले यांच्या कुटुंबीयांचा तसेच पुणे काँग्रेसमध्ये ज्या घराण्यांचे भरीव योगदान राहिले अशा जेधे, मोरे, गाडगीळ, दाभाडे यांच्या कुटुंबीयांचा आणि पुण्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार या वेळी केला जाणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी श्यौराज वाल्मीकी यांची प्रमुख उपस्थिती असेल. दुपारी साडेबारा वाजता हा कार्यक्रम होईल.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे पदाधिकारी तसेच आमदार, नगरसेवक व अन्य प्रमुख कार्यकर्त्यांची बैठकही सायंकाळी होण्याची शक्यता आहे. बैठकीचा हा विषयही चर्चेचा झाला आहे. 

Story img Loader