काँग्रेसला कोण पराभूत करू शकते? उत्तर – काँग्रेसच; असे खात्रीने बोलले जाते. याची प्रचिती गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुणेकरांनीही घेतली. कायम एकमेकांविरुद्ध कुरघोड्या आणि बंडखोरीचा शाप लागलेल्या शहरातील काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत आत्मघातकी राजकारण केले. त्यानंतरही पुरते समाधान न झालेल्या स्थानिक नेत्यांच्या लाथाळ्या सुरूच आहेत. १९३८ पासून शहरात निवडणुका लढण्याची परंपरा असली, तरी त्याचा विसर पडलेली पुण्यातील काँग्रेस भरकटलेल्या अवस्थेत आहे.
पूर्णवेळ शहराध्यक्ष नसल्याने नेतृत्वाचा अभाव आणि पक्षसंघटन शून्यावर पोहोचलेल्या काँग्रेसपुढे आगामी महापालिका निवडणुकीमध्ये सर्व प्रभागांमध्ये उमेदवारांची वानवा असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे एके काळी कायम गर्दीने गजबजलेले काँग्रेस भवन कार्यकर्त्यांविना सुने सुने पडले आहे. या काँग्रेस भवनला ‘जाग’ येणार कधी, असा प्रश्न आता कार्यकर्त्यांनाच पडला आहे; पण स्थानिक नेते पराभूत मानसिकतेतून बाहेर पडायला तयार नाहीत.
हेही वाचा – लाखांमध्ये एका व्यक्तीला होणाऱ्या दुर्मीळ विकारावर महिलेची मात! नेमका काय आहे हा आजार…
पुण्याच्या काँग्रेस आणि काँग्रेस भवनाला ऐतिहासिक परंपरा आहे. महात्मा गांधींनी काँग्रेस भवनाच्या उद्घाटनानिमित्ताने ‘यह मकान सच्चे सेवकों का याने खिदमतगारों का बने’ अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या होत्या. दि. २६ जानेवारी १९४० पासून पुण्यात असलेल्या या वास्तूला ८५ वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीचे उगमस्थान असलेल्या या काँग्रेस भवनातून काँग्रेस कार्यकर्त्यांच्या फळ्या तयार झाल्या. मात्र, सध्या हे काँग्रेस भवन सुनसान अवस्थेत असते. नेते आणि कार्यकर्ते सर्वांनीच या वास्तूकडे पाठ फिरविल्यासारखी स्थिती झाली आहे. त्यामागे काँग्रेसच्या यशाला लागलेली ओहोटी कारणीभूत ठरत आहे.
काँग्रेस १९३८ पासून तत्कालीन नगरपालिकेपासून निवडणुका लढवत आली आहे. पुणे महापालिकेवर तर २००७ पर्यंत माजी खासदार सुरेश कलमाडी यांचा एकहाती अंमल होता. काँग्रेसची महापालिकेतील गेल्या २५ वर्षांतील ताकद पाहता काँग्रेसला कोणीही पराभूत करू शकणार नाही, अशी होती. १९९२ मध्ये ५२ नगरसेवक असलेल्या काँग्रेसचे १९९७ मध्ये १२३ नगरसेवक, २००२ मध्ये ६१ नगरसेवक होते. २००७ मध्ये ३६ नगरसेवक निवडून आले होते. सन २०१२ नंतर मात्र काँग्रेसला उतरती कळा लागली. २०१२ मध्ये नगरसेवकांचे संख्याबळ २८ झाले. २०१७ च्या निवडणुकीत तर अवघे नऊ नगरसेवक निवडून आले. त्यामुळे काँग्रेसची ताकद ही टप्प्याटप्याने क्षीण होत गेली आहे. मागील पाच वर्षांत तर शहरातील काँग्रेसची वाताहत झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेससाठी चांगले वातावरण होते. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यामुळे भाजपपुढे कडवे आव्हान उभे राहिले होते. मात्र, प्रचारात स्थानिक नेत्यांमध्ये एकीचा अभाव दिसला. विधानसभा निवडणुकीत शहरातील आठपैकी कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर या तीन मतदारसंघांमध्ये काँग्रेससाठी सकारात्मक वातावरण होते. कसब्यात माजी महापौर कमल व्यवहारे यांची, तर शिवाजीनगरमध्ये मनीष आनंद यांची बंडखारी काँग्रेसला रोखता आली नाही. व्यवहारे यांचा प्रभाव पडला नसला, तरी प्रचारात हा मुद्दा राहिल्याने धंगेकर यांना फटका बसला. शिवाजीनगरमध्ये दत्ता बहिरट यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये माजी आमदार रमेश बागवे यांना निवडणूक सोपी वाटत असताना त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात विलंब लावण्यात आला. त्यामुळे या तिन्ही ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांना काँग्रेसनेच पराभूत केले.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडची ‘कचरा कोंडी’! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिशीमुळे महापालिका अडचणीत
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील पराभवानंतरही शहाणपण न आलेल्या काँग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण सुरूच आहे. अरविंद शिंदे हे प्रभारी अध्यक्ष म्हणून गेल्या अडीच वर्षांपासून काम करत आहेत. काँग्रेसला पूर्णवेळ शहराध्यक्ष नेमता आलेला नाही. त्यांच्या नेमणुकीपासून गटबाजीला उधाण आले आहे. राज्य पातळीवरील काँग्रेसचे नेतेही लक्ष देत नसल्याने स्थानिक नेत्यांमध्ये मनोमिलन होऊ शकलेले नाही. एकीकडे भाजपने सदस्यनोंदणी सुरू करून महापालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली. मात्र, काँग्रेस अजूनही एकमेकांवर कुरघोडी करण्यातच मश्गूल आहे. महापालिका निवडणुकीची तयारी करण्यामध्ये कोणाला स्वारस्य नसल्यासारखी स्थिती आहे.
महापालिका निवडणूक जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. तोपर्यंत तरी काँग्रेसला पुन्हा जाग यावी. ‘यह मकान सच्चे सेवकों का याने खिदमतगारों का बने’ ही महात्मा गांधीजींच्या शब्दांची येत्या २६ जानेवारीला काँग्रेस भवनच्या वर्धापनदिनी आठवण व्हावी आणि त्या निमित्ताने काँग्रेस भवन पुन्हा जागे व्हावे, ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.
sujit. tambade @expressindia. com