पुणे : काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्यावरील आरोप अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) मागे घेतल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून कलमाडी यांच्या निवासस्थानासमोर जल्लोष करण्यात आला. दरम्यान, ‘सतत खोटे आरोप करून विरोधकांचे चारित्र्यहनन करून सत्ता मिळविणे आणि अभद्र पद्धतीने मिळविलेली सत्ता टिकविण्यासाठी पुन्हा खोटे बोलणे, ही भारतीय जनता पक्षाची कूटनीती यानिमित्ताने पुढे आली आहे,’ अशी प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गैरव्यवहार केल्याचा आरोप माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्यावर करण्यात आला होता. मात्र, त्यांच्यावरील आरोप ईडीने मागे घेतले. त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी कलमाडी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रकृती अस्वस्थामुळे कलमाडी कार्यकर्त्यांना भेटू शकले नाहीत.

यासंदर्भात बोलताना मोहन जोशी म्हणाले, ‘पुण्यात विकासाचा सुवर्णकाळ कलमाडी यांनी निर्माण केला. देशात क्रीडा संस्कृती रुजवली. पुण्याला आंतरराष्ट्रीय नकाशावर नेणाऱ्या कलमाडींवर खोटे आरोप करण्यात आले. त्यांची राजकीय कारकीर्द भाजपने संपुष्टात आणली. ही बाब देश आणि पुणेकर कधीही विसरणार नाहीत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरही भाजपने कोळसा खाण घोटाळ्यासंदर्भात असेच खोटे आरोप केले. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना आरोप करून बदनाम केले. राॅबर्ट वड्रा यांच्यावरही बेछूट आरोप केले. हे सर्व आरोप सत्ता मिळविण्यासाठी त्यांनी केले. मात्र, कलमाडी यांना क्लीन चीट मिळाल्याने सत्यमेव जयते या उक्तीची प्रचिती आली आहे.