महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोन नगरसेविकांचे पद रद्द झाल्यामुळे काँग्रेसने महापालिकेतील विरोधी पक्षनेता या पदावर दावा केला असून या पदाची मागणी करणारे पत्र गुरुवारी काँग्रेसकडून महापौरांना देण्यात आले.
मनसेच्या छाया गदादे (प्रभाग क्रमांक ५६ ब) यांचे नगरसेवकपद लघुवाद न्यायालयाने यापूर्वीच रद्द केले आहे, तसेच मनसेच्या कल्पना बहिरट (प्रभाग क्रमांक ४० ब) यांचीही निवड महापालिका आयुक्तांनी मंगळवारी रद्द केली आहे. या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसने विरोधी पक्षनेता पदावर दावा केला असून तसे पत्र शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी गुरुवारी महापौरांना दिले.
महापालिकेच्या फेब्रुवारी २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत मनसेचे २९, तर काँग्रेसचे २८ नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे मनसेला विरोधी पक्षनेता हे पद देण्यात आले. पुढे मनसेच्या दोन नगरसेविकांचे पद रद्द झाल्यामुळे मनसेच्या सदस्यांची संख्या आता २७ झाली आहे. गदादे यांच्या निर्णयाला न्यायालयाने ६ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली असली, तरीही बहिरट यांचे पद गेल्यामुळे तूर्त तरी काँग्रेस आणि मनसेची सदस्यसंख्या २८-२८ झाली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे बलाबल समान झाल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.
काँग्रेस हा मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष असून मनसे हा मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पक्ष आहे. मुंबई महापालिका अधिनियमातील कलम १९ एक अअ च्या १ मध्ये अशी स्पष्ट तरतूद आहे की, दोन पक्षांचे संख्याबळ समान असेल त्या वेळी महापौर पक्षाचा दर्जा लक्षात घेऊन अशा पक्षांमधून कोणत्याही एका पक्षातील नेत्याला विरोधी पक्षनेता म्हणून मान्यता देतील. या तरतुदीनुसार राष्ट्रीय स्तरावरील पक्षाला प्राधान्य द्यावे लागेल. महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे बलाबल क्रमांक दोनचे झालेले असल्यामुळे या पक्षाच्या गटनेत्याला सत्वर विरोधी पक्षनेता हे पद द्यावे, असे या पत्रात छाजेड यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा