लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : समान पाणीपुरवठा, मेट्रोचे विस्तारीकरण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याबरोबर रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पुण्याला निधी द्यावा, यासाठी केंद्र तसेच, राज्याच्या अर्थसंकल्पात दोन हजार कोटींची तरतूद करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी केली.

अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेत काँग्रेसच्या वतीने जोशी यांनी ही मागणी केली. आपल्या मागणीचे निवेदन जोशी यांनी पवार यांना दिले. त्यानंतर तातडीने पवार यांनी संबधित अधिकाऱ्यांना फोन करून रखडलेल्या प्रकल्पांची माहिती घेत सूचना केल्या. या वेळी काँग्रेसचे दत्ता बहिरट, प्रशांत सुरसे, चेतन अगरवाल, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे, सुरेश कांबळे उपस्थित होते.

आणखी वाचा-पादचाऱ्याला मारहाण करुन मोबाइल चोरणारा गजाआड

याबाबत अधिक माहिती देताना जोशी म्हणाले, ‘शहरातील अनेक प्रकल्प निधीअभावी रखडले आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात केंद्र सरकारकडून फक्त पुणे शहरासाठी म्हणून जवाहरलाल नेहरू एकात्मिक शहरविकास योजनेतून अडीच हजार कोटी रुपयांची तरतूद झाली. राज्य सरकारने ५०० कोटी रुपये दिले. या तीन हजार कोटी रुपयांमधून शहरातील अनेक प्रकल्प मार्गी लागले. शहरात समान पाणीपुरवठा योजना, नदीसुधार, मेट्रोचे विस्तारित मार्ग अशा योजना रखडल्या आहेत. या सर्व गोष्टी अर्थमंत्री अजित पवार यांच्या लक्षात आणून दिल्या.

आणखी वाचा-टीका होताच महापालिका नरमली, निविदा काढूनच होणार शैक्षणिक प्रणालीची खरेदी!

केंद्रात व राज्यातही भाजपचे सरकार आहे. त्यामुळेच दोन्ही सरकारच्या वार्षिक अर्थसंकल्पात फक्त पुणे शहरासाठी म्हणून विशेष भरीव आर्थिक तरतूद करून घ्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली, असल्याचे जोशी म्हणाले. शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी बस खरेदी, रस्त्यांवर वाढत असलेले अतिक्रमण, बेकायदा जाहिरात फलक, तसेच वाढती वाहतूक कोंडी यावर देखील चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress demands ajit pawar to provide rs 2000 crore fund pune print news ccm 82 mrj