विकास आराखडय़ात दर्शवण्यात आलेल्या खराडीमधील एका रस्त्याची निविदा तातडीने मंजूर करावी, असा प्रस्ताव मांडणाऱ्या महापालिका प्रशासनाच्या कृतीबद्दल आणि हा रस्ता घाईगर्दीने मंजूर करणाऱ्या स्थायी समितीच्या निर्णयाबद्दल संशय उत्पन्न झाला असून, पाच कोटी रुपये खर्चाचा हा रस्ता काही बिल्डरांसाठीच घाईने केला जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
स्थायी समितीने घेतलेल्या या निर्णयाला विरोधी पक्षनेता अरविंद शिंदे यांनी विरोध केला असून तसे पत्र त्यांनी मंगळारी आयुक्तांना दिले. विकास आराखडय़ातील रस्ते करण्यासाठी महापालिकेकडे निधी नाही म्हणून हे रस्ते खासगी सहभागातून करण्याचा प्रस्ताव सहा महिन्यांपूर्वी महापालिका आयुक्तांनी आणला होता. त्या वेळी ४७ रस्ते करण्याची योजना होती. मात्र, त्या योजनेला जोरदार विरोध झाल्यामुळे ती योजना बारगळली. यंदाच्या अंदाजपत्रकात विकास आराखडय़ातील २० रस्ते विकसित करण्यासाठी तरतूद असून आतापर्यंत त्यातील एकाही रस्त्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केलेला नव्हता. मात्र, अचानक तातडीचा विषय म्हणून मंगळवारी खराडीतील एका रस्त्याची निविदा मंजूर करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवला आणि समितीनेही तो घाईगर्दीने मंजूर केला, अशी माहिती शिंदे यांनी दिली.
खराडीतील हॉटेल रेडिसन जवळून जाणारा (सर्वेक्षण क्रमांक ८, ३९, ४० मधून) हा रस्ता असून तो १८ मीटर रुंद आणि ७६१ मीटर लांबीचा आहे. रस्त्यासाठी तरतूद फक्त ८० लाखांची असून प्रत्यक्षातील खर्च पाच कोटी रुपये इतका आहे. तरीही तरतूद नसताना हा रस्ता एवढय़ा घाईने कोणासाठी केला जात आहे, असा प्रश्न शिंदे यांनी प्रशासनाला विचारला आहे. एकीकडे या रस्त्यांसाठी निधी नाही,असे कारण प्रशासन दाखवते आणि दुसरीकडे अशा पद्धतीने एकच रस्ता महापालिकेच्या निधीतून केला जात आहे. खराडीमध्ये बिल्डरचे सर्वाधिक प्रकल्प मंजूर झाले आहेत त्यांच्यासाठी हा रस्ता केला जात आहे का, अशी विचारणा करुन, हा रस्ता एवढा घाईने मंजूर करण्याएवढा कोणासाठी महत्त्वाचा आहे, असेही शिंदे म्हणाले.