पुणे : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेतलेल्या काँग्रेसच्या बंडखोरांवर सहा वर्षे निवडणूक बंदी घालण्याचा प्रस्ताव शहर काँग्रेसकडून प्रदेशला पाठविण्यात आला आहे. दरम्यान, बंडखोरांना नोटीस बजाविण्यता आल्यानंतर उमेदवार कमल व्यवहारे आणि मनीष आनंद यांनी काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला असून पर्वतीचे बंडखोर आबा बागुल यांनी अद्यापही खुलासा काँग्रेसकडे केलेला नाही. मात्र, त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाविकास आघाडीतील नेत्यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही कसबा, शिवाजीनगर आणि पर्वती विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवारांना शहर काँग्रेसकडून नोटीस बजाविण्यात आली आहे. बंडाची तलवार म्यान करून महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा जाहीर करावा. तसे न केल्यास निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय शहर काँग्रेसने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर कमल व्यवहारे आणि मनीष आनंद यांनी या नोटीशीला उत्तर दिले असून काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा >>> चिंचवड: वाघ गेला, ही वाघीण पिल्लांना एकटं पडू देणार नाही; आमदार आश्विनी जगताप कुणाला उद्देशून म्हणाल्या?

बंडखोरांना नोटीस पाठवून चोवीस तास उलटताच व्यवहारे आणि आनंद यांनी पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला. बागूल यांनी खुलासा केला नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. व्यवहारे आणि आनंद या दोघांचा राजीनामा प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यात येणार असून पक्षातर्फे सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदी घालण्याचा प्रस्तावही देण्यात येणार आहे. या प्रस्तावानुसार व्यवहारे आणि आनंद यांना पुन्हा पक्षात घेण्यात आले तरी, लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणूक लढवता येणार नाही. आबा बागूल यांनी अद्याप खुलासा केला नसल्याने त्यांच्यावरही अशीच कारवाई करण्यात येणार आहे,’ असे शहर काँग्रेसकडून सांगण्यात आले. दरम्यान, शिवाजीनगरमधील बंडखोर उमेदवार मनीष आनंद यांनी काँग्रेस पक्षसदस्यपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्या पत्नी पूजा या काँग्रेसच्या शहर महिला अध्यक्ष पदावर कायम आहेत. पूजा यांनी भूमिका स्पष्ट करावी, यासाठी नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यांनी पतीचा प्रचार केल्यास त्यांच्यावर त्यांना पदमुक्त करण्यात येणार आहे, असेही काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress election ban rebels for six years who contest against maha vikas aghadi candidate in assembly elections pune print news apk 13 zws