महत्त्वाच्या विषयांवरही मुख्यमंत्री निर्णय घेत नाहीत, पक्षाचे मंत्री बिलकूल काम करत नाहीत. काँग्रेस भवन म्हणजे ‘हप्तेगिरी’चा अड्डा बनला आहे, पिंपरी-चिंचवडला नेत्यांनीच वाऱ्यावर सोडले आहे, अशा संतप्त भावना काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निरीक्षकांसमोरच व्यक्त केल्या. अजितदादांची दादागिरी, काँग्रेसमधील मरगळ, गटबाजीचे राजकारण, पक्षशिस्त पायदळी, विरोधकांशी साटेलोटे यासारख्या मुद्दय़ांकडे निरीक्षकांचे लक्ष वेधण्यात आले.
शहराध्यक्ष सचिन साठे यांनी निरीक्षक शोभा बच्छाव यांच्या उपस्थितीत आजी-माजी नगरसेवकांची बैठक आयोजित केली, त्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांनी परखडपणे मते मांडली. सचिन साठे, आझम पानसरे, हनुमंत भोसले, बाबासाहेब तापकीर, विनोद नढे, कैलास कदम, ज्योती भारती, सुदाम ढोरे, बाबू नायर, विनायक रणसुभे, नारायण लांडगे, सलीम शिकलगार, सिकंदर सूर्यवंशी आदींनी परखडपणे मनोगत व्यक्त केले. शहराशी संबंधित महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतले नाहीत. सत्ता असूनही कामे झाली नाहीत. कार्यकर्त्यांना पदांचे वाटप झाले नाही. प्राधिकरणाचे अध्यक्षपद १० वर्षे रिक्त राहिले. आझम पानसरे यांना विधान परिषदेचा शब्द देऊनही पाळला नाही, स्थानिक नेतृत्वाला ताकद दिली जात नाही, बाहेरचे उमेदवार लादले जातात, तोंड पाहून पदे दिली जातात, ज्येष्ठत्वाचा सन्मान होत नाही, राष्ट्रवादीकडून आघाडी धर्म पायदळी तुडवला जातो, अजित पवार ‘दादागिरी’ करतात, त्यांना ठोस उत्तर दिले जात नाही, तीनपैकी एकतरी मतदारसंघ घ्या, अन्यथा पक्ष संपुष्टात येईल. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीकडून धमक्या दिल्या जातात, असे अनेक मुद्दे कार्यकर्त्यांनी मांडले. त्याचा परामर्श घेत बच्छाव यांनी कार्यकर्त्यांच्या भावना मुख्यमंत्री तसेच प्रदेशाध्यक्षांना कळवू, अशी ग्वाही दिली.
–चौकट–
अमित शहा गुन्हेगार; मोदी फेकू- जोशी
गुजरात येथून आलेले युवक काँग्रेसचे निरीक्षक रुत्विज जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. निवडणूक काळातील एकही आश्वासन मोदींनी पाळले नाही. ते ‘फेकू’ असून त्यांची भाषणे म्हणजे ‘मुंगेरीलाल के सपने’ आहेत, असे ते म्हणाले. भाजपचे अध्यक्ष अमित शहा गुजरातमधील सर्वात मोठे गुन्हेगार असून केंद्रातील भाजपचे अनेक मंत्री डागाळलेले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

Story img Loader