विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी तसेच पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे निरीक्षक आल्यामुळे सोमवारी काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांची मोठीच गर्दी झाली होती. इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली असून पुण्यातील सर्व मतदारसंघ काँग्रेसने लढवावेत अशी आग्रही मागणी या वेळी निरीक्षक रामलालजी सोळंकी यांच्याकडे करण्यात आली.
काँग्रेस भवनात सोमवारी कसबा, शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट आणि हडपसर या चार विधानसभा मतदारसंघांमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे निरीक्षक रामलालजी हे या बैठकीसाठी आले होते. शहराध्यक्ष अभय छाजेड, उपमहापौर बंडू गायकवाड, आमदार मोहन जोशी, शरद रणपिसे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे, महापालिकेतील गटनेता अरविंद शिंदे, माजी आमदार चंद्रकांत छाजेड, बाळासाहेब शिवरकर, तसेच रोहित टिळक यांच्यासह पक्षाचे नगरसेवक व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
कसबा विधानसभा मतदारसंघातून रोहित टिळक, अरविंद शिंदे, कमल व्यवहारे, मिलिंद काची, वीरेंद्र किराड यांची निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे यावेळी सांगण्यात आले, तर शिवाजीनगर मतदारसंघासाठी दत्ता गायकवाड, दत्ता बहिरट, सनी निम्हण यांनी त्यांची बाजू मांडली. कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून लढण्यासाठी आमदार रमेश बागवे इच्छुक असून त्यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांनी बागवे यांच्यावतीने निरीक्षकांपुढे म्हणणे मांडले, तर हडपसर मतदारसंघातून लढण्यासाठी बाळासाहेब शिवरकर आणि बंडू गायकवाड यांनी तयारी दर्शवली.
माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निलंबन रद्द करून त्यांना पुन्हा पक्षात घ्यावे, तसेच पर्वती मतदारसंघ गेल्यावेळी राष्ट्रवादीकडे होता. यावेळी तो काँग्रेसने लढवावा, पुण्यातील सर्व जागा काँग्रेसने लढवाव्यात आदी मागण्या यावेळी रामलालजी यांच्याकडे करण्यात आल्या. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी एकसंधपणे आणि पूर्ण ताकदीने तयार व्हा, असे आवाहन रामलालजी यांनी यावेळी बोलताना केले. वैयक्तिक टीका न करता काँग्रेसने ज्या योजना राबवल्या आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचवा, असेही ते म्हणाले.
विधानसभा निवडणूक तयारीसाठी काँग्रेसच्या निरीक्षकांचा पुणे दौरा
इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली असून पुण्यातील सर्व मतदारसंघ काँग्रेसने लढवावेत अशी आग्रही मागणी या वेळी निरीक्षक रामलालजी सोळंकी यांच्याकडे करण्यात आली.
First published on: 12-07-2014 at 02:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress election tour overture