आपण सर्वच जण ज्या सणाची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो तो सण म्हणजे दिवाळी. या सणांच्या निमित्ताने प्रत्येकाच्या घरी लाडू,चकली,करंजी आणि असे अनेक पदार्थ तयार केलेले पाहायला मिळतात. त्याच प्रमाणे फुलबाजी, लवंगी,वाजवण्याचा आनंद बच्चे कंपनीपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच जण लुटतात. हा सण आपण प्रत्येक जण कुटुंबीय आणि मित्र परिवारासोबत साजरा करीत असतो. पण आपल्यातील एक घटक नेहमी अनेक सण उत्सवापासून वंचित राहतो. तो म्हणजे शहरातील रस्त्यावरील सिग्नल, फुटपाथवर वस्तू विक्री करणारी लहान मुले. याच मुलांसोबत धनत्रयोदशीच्या निमित्ताने पुण्यातील डेक्कन परिसरातील गुडलक चौकातील फुटपाथवर काँग्रेस नेते आबा बागुल यांनी लहान मुलांसोबत दिवाळी साजरी केली.
हेही वाचा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा!
यावेळी पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागूल म्हणाले की, आपल्या शहरात असंख्य लहान मुले सिग्नलवर वस्तू विक्री करतात.त्या मुलांना कोणताही सण साजरा करता येत नाही. हे लक्षात घेऊन मागील १३ वर्षांपासुन या मुलांसोबत दिवाळी सण साजरा करीत आहे. या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून एक समाधान मिळत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच ते पुढे म्हणाले की, शहरातील अनेक भागात अद्याप ही काही मुले दिवाळी सणांपासून वंचित आहेत. हे लक्षात घेऊन शहरातील अनेक मंडळ,संस्थांनी पुढे येऊन या मुलासोबत दिवाळी साजरी करून त्यांच्या आनंदात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.